Makar-Sankranti-2024

मकर संक्रात Makar Sankranti 2024 या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. सध्या मकर संक्रांतीचा दिवस १४ जानेवारी हा आहे. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांत एक दिवसाने पुढे ढकलली जाते म्हणजे १५ जानेवारीला असते. २०२४ मध्ये मकर संक्रांत १५ जानेवारीला आहे. हिंदु धर्मात संक्रांतीला देवता मानले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे. संक्रांतीच्या दुसर्‍या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते. या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले.

हा प्राकृतिक उत्सव आहे, म्हणजे प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव. दक्षिण भारतात हे पर्व ‘थई पोंगल’ नावाने ओळखले जाते. सिंधी लोक या पर्वाला ‘तिरमौरी’ म्हणतात. महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक ‘मकर संक्रांत’ म्हणतात आणि गुजरातमध्ये हे पर्व ‘उत्तरायण’ नावाने ओळखले जाते.

या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते. या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असल्याने साधना करणाऱ्याला या चैतन्याचा लाभ होतो. कर्क संक्रांती पासून मकर संक्रांती पर्यंतच्या काळाला ‘दक्षिणायन’ म्हणतात. दक्षिणायनापेक्षा उत्तरायणात मरण येणे अधिक चांगले समजले जाते. ‘संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो; कारण या काळात ब्रह्मांडात आप, तसेच तेज या तत्त्वांशी संबंधित कार्य करणार्‍या ईश्वरी क्रियालहरींचे प्रमाण अधिक असते.’

तीळगुळाचे महत्त्व

तीळ सत्त्व लहरी ग्रहण अन् प्रक्षेपण करतो. तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होते. इतरांना तीळगूळ देण्यापूर्वी देवासमोर ठेवल्याने त्यातील शक्ती व चैतन्य टिकून रहाते. समाेरच्याला दिल्यावर त्याच्यातील प्रेमभाव आणि सकारात्मकता वाढते.


मकर संक्रांत ते रथसप्तमी पर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या वेळी केलेली पुण्य कर्मे विशेष फलद्रूप होतात. धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व आहे.  सुवासिनी हळदी – कुंकवाचा कार्यक्रम करून जे देतात, त्याला ‘वाण देणे’ असे म्हणतात. ‘वाण देणे’ म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांनी शरण जाणे. संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते.

आजकाल अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा पडली आहे. या वस्तूंपेक्षा सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, देवतांची चित्रे, अध्यात्मविषयक ध्वनीचित्र-चकत्या इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण द्यावे.

हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गा देवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते अन् श्रद्धापूर्वक हळद-कुंकू लावणाऱ्या  जिवासाठी कार्य करते. हळदी-कुंकू करणे, म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे. हळदी-कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जिवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो. हळदी-कुंकू आणि वाण देणे आदी विधीतून जिवावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास साहाय्य होते.

मकर संक्रांतीच्या सणाला ‘सुगड’ लागतात. सुगड म्हणजे छोटे मातीचे मडके. सुगडांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे (कांड्या), शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, हळदी-कुंकू इत्यादी भरतात. रांगोळी घालून पाट मांडून त्यावर पाच सुगड ठेवतात. त्यांचे पूजन करतात. तीन सुगड सवाष्णींना दान (वाण) देतात, एक सुगड तुळशीला आणि एक स्वतः करिता ठेवतात.

या दिवशी महादेवाला तीळ-तांदूळ अथवा तीळ-तांदूळ मिश्रित अर्घ्य अर्पण करण्याचा विधान आहे. तिळाचे उटणे, तीळमिश्रित पाण्याचे स्नान, तीळमिश्रित पाणी पिणे, तिळाचे हवन करणे, स्वयंपाकात तिळाचा वापर, तसेच तिळाचे दान हे सर्व पापनाशक प्रयोग आहेत; म्हणून या दिवशी तीळ, गूळ, साखरमिश्रित लाडू खाण्याचे, तसेच दान करण्याचे महत्त्व आहे.