- बँक खात्यात ६० सहस्र रुपये, तसेच परतीचे तिकीट असणे बंधनकारक !
- पर्यटन व्हिसावर येणारे नोकरी करू लागतात, असा संयुक्त अरब अमिरातीला अनुभव !
अबू धाबी (संयुक्त अरब अमिराती) – विमानाने दुबई आणि अबू धाबी येथे प्रवास करणार्या भारतीय पर्यटकांसाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार पर्यटकांना त्यांच्या बँक खात्यात ६० सहस्र रुपये किंवा क्रेडिट कार्ड आणि परतीचे तिकीट असणे आवश्यक करण्यात आले आहे. या अटींची पूर्तता न करणार्या प्रवाशांना दुबई आणि अबू धाबी विमानतळांवरूनच भारतात परत पाठवले जात आहे.
वर्ष २०२३ मध्ये १ कोटी १९ लाख भारतीय पर्यटकांनी दुबईला भेट दिली
संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारी विभागाने सांगितले की, नवीन नियमांद्वारे ‘पर्यटक (टूरिस्ट) व्हिसा’चा गैरवापर थांबवला जाऊ शकतो. काही प्रकरणांत लोक ‘टुरिस्ट व्हिसा’वर दुबई-अबू धाबी येथे जातात आणि येथे नोकरी करू लागतात. काही प्रकरणात परतण्यासाठी काही लोकांकडे पैसे नसतात; म्हणून त्यांना हद्दपार केले जाते. यामुळे तेथे पर्यटनासाठी जाणार्या प्रवाशांकडे आवश्यक कागदपत्रे आणि बँकेत किती पैसे शिल्लक आहेत ?, याची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. याखेरीज हॉटेलच्या आरक्षणाची कागदपत्रेही असणे आवश्यक आहे.
जर पर्यटक कुटुंबातील एखाद्या सदस्याला भेटायला जात असेल, तर त्याला कुटुंबातील सदस्याचा पत्ता, संपर्क क्रमांक आणि इतर तपशील द्यावा लागेल. मुख्यत्वे तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक जात असल्याने त्यांची येथे कडक तपासणी केली जात आहे. संयुक्त अरब अमिराती सरकारने विमान आस्थापनांनाही ताकीद दिली आहे की, जर त्यांच्या विमानातून अटी पूर्ण न केलेले पर्यटक आले, तर त्यांना दंड आकारला जाईल.
संयुक्त अरब अमिरातीत अनुमाने ३५ लाख भारतीय रहातात. ही संख्या त्यांच्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के आहे आणि इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत येथे भारतियांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचसमवेत संयुक्त अरब अमिराती हा भारताला रशिया, सौदी अरेबिया आणि इराक यांनंतर चौथा सर्वांत मोठा तेल पुरवठादार देश आहे.