News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

मुंबई, दि. 5 : पर्यावरण आणि प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्याचे विपरीत परिणाम ग्लोबल वॉर्मिगच्या स्वरूपात पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे एकल वापर प्लॅस्टिकचा वापर नकोच, असा संकल्प आजच्या जागतिक पर्यावरण दिवशी करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

‘भामला फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आजच्या पर्यावरण दिनानिमित्त ‘सोल्यूशन टू प्लास्टिक पोल्यूशन’ अशी संकल्पना घेऊन राज्य शासन काम करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाईफ स्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवेळी पाऊस, वाढते तापमान आदी समस्या जगाला भेडसावत आहेत. या समस्येवर वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन हाच उपाय आहे. प्रदूषण निर्मूलनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि राज्य शासन प्रयत्न करीत आहे. मात्र, या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास प्रदूषण निर्मूलन चळवळीस बळ प्राप्त होईल. प्रदूषण निर्मूलनासाठी ‘भामला फाऊंडेशन’ या संस्थेचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.