लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत (Election) दिव्यांग (disabled) आणि वृद्ध यांना घरबसल्या मतदान (Voting) करता येणार !

11

मुंबई, १ जून (वार्ता.) – वर्ष २०२४ च्या होणार्‍या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत (Election) यावर्षी दिव्यांग आणि ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या मतदारांना घरीच मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाकडून करण्यात येणार आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अशा प्रकारे प्रथमच प्रयोग केला जात आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली.

लोकसभेची निवडणूक घोषित झाल्यानंतर ५ दिवसांच्या आत दिव्यांग आणि वृद्ध व्यक्ती यांना घरी राहून मतदान करण्यासाठीच्या पर्यायाचा ‘१३ डी’ हा अर्ज भरून घेण्यात येईल. तो भरून झाल्यानंतर त्यानुसार त्यांच्या मतदानासाठी आवश्यक ‘टपाल मतपत्रिकांच्या छपाईची ‘ऑर्डर’ देण्यात येईल. यापूर्वी लोकसभेची पोटनिवडणूक आणि मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी येथील जागेची पोटनिवडणूक या वेळी दिव्यांग आणि वृद्ध यांसाठी घरी मतदान करण्याची सुविधा देण्यात आली होती. सार्वत्रिक निवडणुकीत ही सुविधा प्रथमच देण्यात येत आहे. यामुळे मतदारांच्या संख्येत १-२ टक्के वाढ होण्याची शक्यता या वेळी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केली.

अशी होणार लोकसभेच्या निवडणुकीची पूर्वसिद्धता !

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वसिद्धतेचा कार्यक्रम नुकताच प्राप्त झाला आहे आहे. यानुसार ११ जूनपर्यंत राज्यातील ११५ जणांना निवडणूक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यांच्याद्वारे जिल्हा आणि केंद्र स्तरावर प्रशिक्षण देण्यात येईल. जुलै मासात निवडणुकीची केंद्र निश्चित करणे, मतदान पेट्यांची पहाणी, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवणे, मतदानपेट्या साठवणुकीच्या गोदामांची व्यवस्था, मतदानयंत्रांची चाचपणी, मृत मतदारांची नावे रहित करणे, राज्यातून कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे हस्तांतरित करणे आदी कामे युद्धपातळीवर चालू करण्यात येणार आहेत. १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदारांच्या पुनर्रिक्षणाचा विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन १८ वर्षे पूर्ण झालेल्या उमेदवारांचा निवडणूक अर्ज भरून घेणार आहेत, असे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

५० टक्क्यांहून अधिक मतदानकेंद्रे थेट प्रक्षेपणाद्वारे पहाता येणार !

लोकसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात एकूण ९६ सहस्र मतदानकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. यांमध्ये संवेदनशील मतदानकेंद्रांमध्ये कोणताही अपप्रकार होऊ नये, यासाठी ६७ मतदानकेंद्रांच्या ठिकाणी ‘सी.सी.टि.व्ही. कॅमेरे’ लावण्यात येणार आहे. त्यामुळे या केंद्रांवरील घडामोडी थेट प्रक्षेपणाद्वारे पहाता येणार आहेत, अशी माहिती श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

सामाजिक माध्यमांवरील अफवांना नियंत्रित करण्यासाठी स्वतंत्र टीम !

मतदानाच्या कालावधीत सामाजिक माध्यमांवरून पसरवल्या जाणार्‍या अफवांना रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून ‘सोशिअल मॅनेजिंग टास्क’ नावाची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवण्यात येणार आहे. या यंत्रणेद्वारे मतदानाविषयीच्या अफवांचे, तसेच खोट्या बातम्यांचे त्वरित स्पष्टीकरण केले जाईल, असे श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

बातमी संदर्भ – सनातन प्रभात