ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत तांत्रिक श्रेणीतील ८ हजार ५०० रिक्त पदे भरण्याचे ऊर्जामंत्री श्री नितिन राऊत यांचे आदेश. यंत्रचालक व तंत्रज्ञ संवर्गाचे एकत्रीकरण करण्याचाही निर्णय. तांत्रिक संवर्गातील ६७५० व अभियंता संवर्गातील १७६२ पदांच्या मेगाभरतीची महापारेषणकडून तयारी.
ऊर्जामंत्री राऊत यांच्या सूचनेनुसार महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी पदभरती प्रस्ताव तयार करून सादर केला. मंत्रालयात या विषयावर झालेल्या बैठकीत राऊत यांनी ही पदभरती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. तांत्रिक संवर्गातील ६ हजार ७५० पदे व अभियंता संवर्गातील १ हजार ७६२ पदांची मेगाभरती करण्यासाठी महापारेषण व्यवस्थापन तयारी करीत आहे, असे ते म्हणाले. नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही सरकारी नोकरीची संधी मिळेल.
बक्षी समितीच्या शिफारशींनुसार पदांचा तुलनात्मक विचार करण्यात येऊन भरती प्रक्रिया राबविण्यात यावी व राज्य शासनास नवा मंजूर पदांचा आकृतीबंध सादर करावा, असे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले. पूर्वीच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे सन २००५मध्ये महावितरण, महापारेषण, महानिर्मिती व सूत्राधारी कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर महापारेषण कंपनीत रिक्त पदांची संख्या वाढत गेली. मात्र, अपेक्षित भरती झाली नाही. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा वाढत होता.