अतीवृष्टीग्रस्तांसाठी राज्यशासनाकडून १० सहस्र कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य घोषित

78

मुंबई – अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकर्‍यांसाठी राज्यशासन १० सहस्र कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य घोषित करत आहे. दिवाळीपर्यंत हे साहाय्य शेतकर्‍यांना पोचवण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. २३ ऑक्टोबर या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘या साहाय्यामध्ये शेती, पूल-रस्ते यांचे बांधकाम, पाणीपुरवठ्याची कामे या कामांच्या निधीचाही समावेश आहे. परिस्थिती कठीण आहे. जनतेला ज्या प्रकारे आर्थिक चणचण आहे, त्याप्रमाणे राज्यशासनाच्या पुढेही अनेक आर्थिक अडचणी आहेत. केंद्रशासनाकडून येणे असलेले ३८ सहस्र कोटी रुपये अद्यापही मिळालेले नाहीत. अद्यापही पूर आणि अतीवृष्टी याविषयी केंद्राचे पथक पहाणीसाठी आलेले नाही. आम्ही २-३ वेळा विनंती केली आहे. त्यांच्याकडून साहाय्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. राज्यशासन शेतकर्‍यांवर संकट येऊ देणार नाही, हा आमचा शब्द आहे. सणासुदीच्या दिवसांत शेतकर्‍यांच्या डोळ्यांत अश्रू असू नये, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.’’