जागतिक तापमानवाढीचा (global warming) प्रकोप : अमेरिका, युरोप आणि आफ्रिका खंडांत हाहा:कार !

7

रोम (इटली) – हवामान पालटाच्या (global warming) वाढत्या गतीमुळे जागतिक तापमानवाढीचे संकट अधिक भयावह होत चालले आहे. भीषण उष्णतेच्या लाटांनंतर जिथे उत्तर भारतात होत असलेल्या अतीवृष्टीमुळे ९० लोक मृत्यूमुखी पडले, तिथे अमेरिका, युरोप, आफ्रिका येथील देशाचे नागरिक उष्णतेने त्रस्त असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे तापमानाचे नवीन विक्रमही प्रस्थापित होत आहेत.

भीषण उष्णतेमुळे तब्बल ११ कोटी अमेरिकी नागरिकांना फटका !

गेल्या १६ दिवसांत अमेरिकेच्या कॅलिफोर्नियापासून टेक्सासपर्यंत भीषण उष्णता आहे. अमेरिकेची एक तृतीयांश जनता म्हणजे तब्बल ११ कोटी लोक यामुळे त्रस्त आहेत. हवामान विभागाने भयावह उष्णतेची सूचना जारी केली आहे. जगातील सर्वांत उष्ण स्थानांपैकी एक असलेल्या कॅलिफोर्निया राज्यातील ‘डेथ व्हॅली’चे तापमान सध्या ४८ अंश सेल्सियस असून ते ५४ अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उष्णतेमुळे कॅनडातील जंगलांमध्ये आग लागली असून आतापर्यंत अडीच कोटी एकर भूमी जळून खाक झाली आहे.

रोम (इटली) येथे सर्वाधिक तापमान गाठण्याची शक्यता !

युरोपीय देश इटलीमध्ये उष्णतेने ऐतिहासिक विक्रम स्थापित केले आहेत. सरकारने रोम, बोलोग्ना आणि फ्लोरेंस यांच्यासह १६ शहरांमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. हवामान विभागाने आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्णता सहन करण्यासाठी नागरिकांनी सिद्ध रहावे, अशी चेतावणी नागरिकांना दिली आहे. राजधानी रोममध्ये १७ जुलैला ४० अंश सेल्सियसपर्यंत तापमान जाऊ शकते, तर १९ जुलै या दिवशी पारा ४३ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रोममध्ये आतापर्यंत ४०.५ अंश सेल्सियस हे सर्वाधिक तापमान ऑगस्ट २००७ मध्ये नोंदवले गेले होते.

सार्दिनिया आणि सिसिली या मेडिटरेनियन द्विपांवरील तापमान ४८ अंश सेल्सियसपर्यंत जाऊ शकते. असे झाले, तर हे युरोपातील आतापर्यंतचे सर्वांत अधिक तापमान असेल. फ्रान्समध्ये उष्णतेच्या लाटेमुळे दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १८ जुलैपासून भीषण उष्णतेमुळे याआधीचे सर्व विक्रम मोडीत काढले जातील, असे सांगण्यात येत आहे. स्पेनमधील पारा हा गेल्या काही दिवसांपासून ४० अंश सेल्सियसहून वर आहे.

आफ्रिकी देश मोरक्कोमध्ये उष्णतेमुळे हाहा:कार !

उत्तरी आफ्रिकी देश मोरक्कोमध्येही तीव्र उष्णतेमुळे नवनवीन विक्रम स्थापित होत आहेत. येथे १५ आणि १६ जुलै या दिवशी अनेक प्रांतांमध्ये ४७ अंश सेल्सियस तापमान राहिले. एवढे अधिक तापमान शक्यतो ऑगस्ट मासात नोंदवले जाते. १५ दिवसांपूर्वीच पारा एवढा चढल्याने वैज्ञानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे पाण्याची न्यूनता पहायला मिळत असलेल्या जॉर्डनमध्ये अजलूनच्या जंगलांमध्ये आग लागल्याने तेथील स्थिती अधिक बिकट बनली आहे. ही आग विझवण्यासाठी जॉर्डन सरकारला तब्बल २१४ टन पाणी वापरावे लागले. इराकमधील टिगरीस नदी वाळली असून तेथे ५० अंश सेल्सियस तापमान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.