
महाराष्ट्र सरकारने वाहनांसाठी हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत आता १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, ही मुदत पूर्ण झाल्यानंतर १६ ऑगस्टपासून कारवाई सुरू करण्यात येईल.
ही HSRP संदर्भातील तिसरी वेळ आहे जेंव्हा सरकारने मुदत वाढवली आहे. आधी ३१ मार्चपासून एप्रिल अखेर, त्यानंतर जून अखेरपर्यंत वाढ देण्यात आली होती. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांना ही नवीन प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात अंदाजे २.१० कोटी जुनी वाहने आहेत, पण केवळ २३ लाख वाहनांवरच HSRP बसवण्यात आली आहे.
HSRP न लावणाऱ्यांवर कारवाई:
परिवहन आयुक्तालयाने स्पष्ट केले की १५ ऑगस्टनंतरही HSRP न लावलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाईल. मात्र, १५ ऑगस्टपूर्वी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक केलेल्या वाहनधारकांवर कारवाई होणार नाही.
HSRP अपॉइंटमेंट कशी बुक करावी?:
१. Maharashtra Transport Department Website या संकेतस्थळावर जा.
२. मुख्य मेनूमधील “HSRP” पर्यायावर क्लिक करा.
३. “HSRP Online Book” निवडा व आपल्या RTO कार्यालयाचे स्थान निवडा.
४. आवश्यक माहिती भरून अपॉइंटमेंट बुक करा.
हे लक्षात ठेवा की, वाहन कुठल्याही RTO मध्ये नोंदणीकृत असले तरी HSRP फिटमेंट इतर शहरातील केंद्रावर अधिकृत संस्थेमार्फत बसवता येते. आपल्या घराजवळ किंवा कार्यालयाजवळील केंद्र निवडण्यास प्राधान्य द्या.
HSRP प्रकल्पाची पार्श्वभूमी:
डिसेंबर २०२४ मध्ये HSRP प्रकल्प सुरू करण्यात आला होता आणि वाहनधारकांना ३१ मार्च ही सुरुवातीची अंतिम मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत तिसऱ्यांदा वाढवण्यात आली असून, शासनाने यावेळी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर अपॉइंटमेंट बुक करा व दंडात्मक कारवाईपासून स्वतःला वाचवा.