भारताने बुधवार, ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानात घुसखोरी करत एअर स्ट्राइक केला. या हल्ल्यात भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ नष्ट केले. त्यानंतर पाकिस्तानने भारताच्या १५ प्रमुख लष्करी ठिकाणांवर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार करत अत्याधुनिक S-400 एअर डिफेन्स सिस्टीम वापरली आणि पाकिस्तानचे मिसाईल्स व ड्रोन्स हवेतच पाडले.
S-400: भारताचे सुदर्शन चक्र
भारताने पहिल्यांदाच S-400 सिस्टीम युद्धात वापरली. ही रशियन बनावटीची प्रणाली ४०० किमी अंतरावरून शत्रूच्या हालचाली टिपू शकते. ती ड्रोन्स, फायटर जेट्स, मिसाईल्स यांसारख्या हवाई हल्ल्यांना अचूकपणे रोखण्यास सक्षम आहे. फक्त ५-१० मिनिटांत ऑपरेशनसाठी सज्ज होणारी ही यंत्रणा कोणत्याही भागात सहज हलवता येते.
पाकिस्तानकडून १५ शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न
पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, अदमपूर, बठिंडा, चंदीगढ, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने सर्व हल्ले निष्फळ केले.
भारताचे ५० ड्रोन हल्ले – पाकिस्तानला चोख उत्तर
पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने आज प्रत्युत्तरादाखल १२ पाकिस्तानी शहरांवर ५० ड्रोन हल्ले केले. या कारवाईत पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमसह काही अण्वस्त्र साठवणूक असलेल्या भागांनाही लक्ष्य करण्यात आले.
S-400 ची तांत्रिक वैशिष्ट्ये
- ४०० किमी अंतरावरील टार्गेटवर अचूक हल्ला
- 92N6E रडारद्वारे ६०० किमी अंतरावरून मल्टिपल टार्गेट्स ट्रॅकिंग
- एका वेळी १६० टार्गेट्स ट्रॅक करण्याची क्षमता
- एका टार्गेटवर दोन मिसाईल्सने हल्ला शक्य
- ३० किमी उंचीवरील हवाई लक्ष्य टिपण्याची क्षमता