मराठी भाषा संस्कृतनंतर जगातील सर्वांत सात्त्विक भाषा आहे. नादब्रह्माची अनुभूती देणार्या मराठी भाषेच्या अंगभूत सात्त्विकतेचा लाभ आपण स्वतःच्या आचरणातून घ्यायला हवा. यासाठी प्रत्येकानेच शुद्ध मराठीतून बोलण्याचा प्रयत्न करायला हवा; कारण जेथे उच्चारांची शुद्धता असते, तेथे पावित्र्य असते आणि तेथेच ईश्वरी तत्त्व आकृष्ट होते.
‘मराठी भाषा सर्वसमावेशक असून तिच्यात अन्य भाषांतील शब्द सहजतेने सामावले आहेत. त्यामुळे ती व्यापक आहे’, असे काही आंग्लाळलेल्या विद्वानांचे म्हणणे आहे; परंतु ‘भाषाभिमानाचा संबंध थेट राष्ट्राभिमानाशी आहे’, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्राप्रमाणेच मराठी भाषेवरही यवनी सत्तेकडून करण्यात आलेली आक्रमणे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या उत्तराधिकार्यांनी परतवून लावली. त्यानंतर भाषेवर झालेल्या इंग्रजीच्या आक्रमणाला परतवून लावण्याचे कार्य निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी केले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्य सर्व आंदोलने सांभाळून भाषाशुद्धीचे कार्य अनेक वर्षे चालवून ते नेटाने पुढे नेले. दैनंदिन व्यवहारात अनेक स्वकीय शब्द वापरायची सवय महाराष्ट्राला झाली ती सावरकरांमुळेच ! येथेही दैनंदिन व्यवहारातील काही स्वकीय शब्द आम्ही दिले आहेत.
मराठी भाषा अप्रतिम सौंदर्याने नटलेली आहे. शब्दांच्या विविध छटा असलेल्या मराठी भाषेत एकाच शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. र्हस्व आणि दीर्घ योग्य प्रकारे न लिहिल्यास अर्थात होणारे पालट, चिन्हांचे (एकेरी अवतरणचिन्हे, स्वल्पविराम यांचे) स्थान पालटल्यामुळे वाक्याच्या अर्थावर होणारा परिणाम, अक्षरावर अनुस्वार दिल्यामुळे होणारे दोन अर्थ, वाक्यरचना आणि व्याकरण न पालटता दोन अर्थ होणारी वाक्ये या लेखात दिली आहेत. तसेच मराठी भाषेतील काही गंमती आणि विनोदही येथे दिले आहेत. अर्थाने परिपूर्ण नटलेले शब्द असणारी ही एकमेव भाषा असावी. मराठी भाषेत शब्दांना लागणार्या काना, मात्रा, अनुस्वार, स्वल्पविराम, संधी, विभक्ती, प्रत्यय इत्यादींच्या वापराला महत्त्व आहे; कारण त्यांच्या अनाठायी वापराने शब्दाचा अर्थ पालटतो. छोट्याशा स्वल्पविरामानेही अर्थाचा अनर्थ होतो.
र्हस्व, दीर्घ योग्य प्रकारे न लिहिल्यास अर्थात पालट होणे
१. रवि / रवी
अ. रवि – सूर्य
आ. ताक घुसळण्याची रवी
२. विट / वीट
अ. विट – बांधकामात वापरली जाते ती
आ. वीट – कंटाळा येणे या अर्थी
बोलीभाषेच्या न्यूनगंडामुळे मराठी भाषा दुर्लक्षित !
सर्वांधिक बोलल्या जाणार्या सूचीत आज मराठी भाषा १५ व्या क्रमांकावर असली, तरी ती साचल्यासारखी झाली आहे. तिच्यात वाढ होत नाही. मग तिला फुगवण्यासाठी इंग्रजी शब्दांचा वापर होऊ लागला. जर इंग्रजी भाषेशी जुळवून घेतले, तरच मराठी भाषा टिकेल, या समजुतीतून माध्यमांनी इंग्रजीमिश्रित मराठी भाषेचा वापर चालू केला. दुर्दैवाने या क्षेत्रात नव्याने येणार्या तरुणांना अनेक मराठी शब्दांचे अर्थ ज्ञात नसतात. बोलीभाषेचा न्यूनगंड यासाठी कारणीभूत आहे. तो नसता, तर आज मराठी भाषाही रसरशीत झाली असती. त्यामुळे इंग्रजीला उत्तर द्यायचे, तर आपल्या बोलीभाषांना मान द्यायला शिकले पाहिजे. या भाषा भावनांच्या भाषा आहेत. पैशाच्या भाषा नाहीत. त्यांच्याशी असलेले भावनिक नाते टिकवले पाहिजे.
– जयंत पवार (संदर्भ : मासिक विवेक, १३.१.२०१३)
लेखाचा संदर्भ – सनातन संस्था अधिक माहितीसाठी