प्रखर हिंदुत्वनिष्ठ यूट्यूब चॅनल ‘स्ट्रिंग रिव्हील्स’वर बंदी.

3

मुंबई – हिंदु आणि भारतविरोधी शक्तींच्या षड्यंत्रांचा सोदाहरण भांडाफोड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या यूट्यूब चॅनलवर यूट्यूबने तडकाफडकी बंदी लादली आहे. यामागे कारण देतांना यूट्यूबने सांगितले की, या चॅनलने त्यांच्या नियमांचे गंभीररित्या उल्लंघन केले आहे.

स्ट्रिंग रिव्हील्सने ही माहिती ‘एक्स’द्वारे पोस्ट करून दिली आहे. यामध्ये ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ने सांगितले की, यूट्यूबने आतापर्यंत कधीच अशा प्रकारे त्यांना एखाद्या आक्षेपार्ह व्हिडिओच्या विरोधात चेतावणी दिली नाही; थेट त्यांच्यावर प्रतिबंध लादण्याची अन्याय्य कारवाई केली. ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ने पुढे म्हटले आहे की, यूट्यूबने कुणाचे मन राखण्यासाठी ही कारवाई केली, हे त्याने स्पष्ट करावे. आम्ही तुमच्या विरोधात पुष्कळ दूरपर्यंत जाऊन लढू शकतो, हे तुम्ही विसरू नका. तसेच अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी केवळ यूट्यूब हे एकच माध्यम नाही, हेसुद्धा ध्यानात असू द्या ! स्ट्रिंग रिव्हील्सवरील या कारवाईच्या विरोधात ‘एक्स’वरून हिंदूंनी संताप व्यक्त केला आहे. अनेक हिंदुत्वनिष्ठांनी ‘आम्ही ‘स्ट्रिंग रिव्हील्स’सोबत असल्याचे आणि त्यांच्यासाठी लढा देण्यासाठी सज्ज आहे’, असे म्हटले आहे.