‘दसरा हा देवीचा सण आहे. देवी ही शक्तीची देवता आहे. यासाठी आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीचे आवाहन करून रामनवमीप्रमाणे नऊ दिवस तिचे भजन, पूजन, कीर्तन करायचे असते. अष्टमीच्या दिवशी सरस्वतीस्वरूपी भगवतीचे पूजन, नवमीच्या दिवशी शस्त्रगर्भा देवीचे पूजन आणि दशमीच्या दिवशी शमीचे अन् शांततेचे पूजन करायचे असते. हे शांततेचे पूजन आपल्या गावाच्या शिवेबाहेर जाऊन करायचे असते. ‘गावाप्रमाणेच गावाबाहेरही शांतता राखून जिकडे तिकडे सुखसमृद्धी आणू’, असा यामागचा अर्थ आहे. बाहेर सर्वत्र शांतता राखण्यासाठी शस्त्रे, अस्त्रे, सैन्य इत्यादींचे प्रदर्शन करायचे असते आणि शत्रू असेल, तर त्याचे पारिपत्य करण्यासाठी या दिवशी निघायचे असते. शत्रूचे पारिपत्य करून शांतता प्रस्थापित केल्यानंतर सर्वांना सोने वाटावयाचे असते.
‘आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. या दिवशी रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला. सर्व संपत्तीचे दान करून नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्साला १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या. रघु कुबेरावर आक्रमण करण्यास सिद्ध झाला. आपटा आणि शमी या वृक्षांवर कुबेर सुवर्णांचा वर्षाव करतो. कौत्स केवळ १४ कोटी सुवर्णमुद्रा घेतो. बाकीच्या सुवर्णमुद्रा प्रजाजन नेतात. त्या काळापासून, म्हणजेच त्रेतायुगापासून हिंदु लोक विजयादशमी महोत्सव साजरा करतात.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, ऑक्टोबर २००७)
श्रीराम आणि हनुमान तत्त्वे अन् क्षात्रवृत्ती जागृत करणारा दसरा
दसर्याच्या दिवशी ब्रह्मांडात श्रीरामतत्त्वाच्या तारक, तर हनुमानतत्त्वाच्या मारक लहरींचे एकत्रिकीकरण झालेले असते. दसरा या तिथीला जिवाचा क्षात्रभाव जागृत होतो. या क्षात्रभावातूनच जिवावर क्षात्रवृत्तीचा संस्कार होत असतो. या क्षात्रभावातून आपल्याला ईश्वरी राज्याची स्थापना करावयाची आहे. दसर्याला श्रीराम आणि हनुमान यांचे स्मरण केल्याने जिवात दास्यभक्ती निर्माण होऊन श्रीरामाचे तारक, म्हणजेच आशीर्वादरूपी तत्त्व मिळण्यास साहाय्य होते.
दसर्याच्या दिवशी इष्टमित्रांना आपट्याची पाने ‘सोने’ म्हणून वाटण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्यानाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत. असे हे विजयी वीर किंवा शिलेदार मोहिमेवरून परत आले की, दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे. मग ते परमुलखातून लुटून आणलेल्या त्या संपत्तीतला एखादा नग त्या ओवाळणीच्या तबकात टाकीत असत. घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत. नंतर देवाला आणि वाडवडिलांना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत. या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली आहे.
या दिवशी राजे, सामंत आणि सरदार हे वीर आपापली उपकरणे आणिशस्त्रांचे पूजन करतात. त्याचप्रमाणे शेतकरी आणि कारागीर हे आपापली आऊते आणि हत्यारे यांची पूजा करतात. (काही लोक ही शस्त्रपूजा नवमीच्या दिवशीही करतात.) लेखणी आणि पुस्तके ही विद्यार्थ्यांची शस्त्रेच होत; म्हणून विद्यार्थी त्यांचे पूजन करतात. या पूजनामागील उद्देश हा की, त्या त्या गोष्टींमध्ये ईश्वराचे रूप पाहणे, अर्थात ईश्वराशी एकरूपता साधण्याचा प्रयत्न करणे.
संदर्भ – सनातन प्रभात ( लेख आणि फोटो)