देशातील सरकारी कार्यक्रमांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने नव्या मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा करताना सरकारी समारंभ, शासकीय शाळा तसेच विविध अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत गायन अनिवार्य राहील, असे स्पष्ट केले आहे.
नवीन नियमांनुसार गीत सादर करताना उपस्थित सर्वांनी सन्मान म्हणून उभे राहणे आवश्यक असेल. आतापर्यंत अनेक कार्यक्रमांमध्ये फक्त दोन कडवी गायली जात होती, मात्र आता संपूर्ण सहा कडव्यांचे गायन करण्यात येणार आहे. या विस्तारित आवृत्तीत देवी दुर्गेचा उल्लेखही समाविष्ट आहे. पूर्वी सादरीकरणासाठी सुमारे एक मिनिटाचा कालावधी लागत होता, तर आता संपूर्ण गीतासाठी सुमारे तीन मिनिटांहून अधिक वेळ लागणार आहे.

सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभर विविध उपक्रम राबवले गेले. त्याच उपक्रमांच्या पुढील टप्प्यात या नव्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.
नव्या निर्देशांमध्ये झेंडा वंदन सोहळे, राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या उपस्थितीतील कार्यक्रम, अधिकृत भाषणे किंवा राष्ट्राला उद्देशून केलेले संबोधन यांपूर्वी राष्ट्रीय गीत सादर करण्याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत (जन गण मन) दोन्ही सादर करायचे असल्यास प्रथम ‘वंदे मातरम्’ आणि त्यानंतर ‘जन गण मन’ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या संदर्भातील सविस्तर सूचना सर्व राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश तसेच विविध घटनात्मक संस्थांना पाठवण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाने २८ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या १० पानी मार्गदर्शक दस्तावेजात कोणत्या कार्यक्रमांमध्ये गीत सादर करणे बंधनकारक राहील याची स्पष्ट यादी दिली आहे.
विशेष बाब म्हणजे या नव्या नियमांमध्ये चित्रपटगृहांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये ‘वंदे मातरम्’ सादर करणे अनिवार्य नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे आगामी काळात देशभरातील शासकीय आणि औपचारिक कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ अधिक व्यापक स्वरूपात सादर केले जाणार असून राष्ट्रीय गीताबद्दल जनजागृती आणि आदरभाव वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











