- मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला दिलासा देणाऱ्या आणि शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या ‘धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी रस्ता’ प्रकल्पात आणखी एक अनोखी भर पडली आहे. या मार्गावर देशातील पहिला संगीतमय रस्ता कार्यान्वित करण्यात आला असून, यामुळे वाहन प्रवासाचा अनुभव अधिक वेगळा आणि आकर्षक होणार आहे.
या संकल्पनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. उद्घाटनानंतर प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे वाहन संगीतमय पट्ट्यांवरून नेण्यात आले. वाहन त्या विशेष पट्ट्यांवरून जाताच ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील लोकप्रिय ‘जय हो’ या गाण्याची धून स्पष्टपणे ऐकू आली आणि उपस्थितांनी या नव्या तंत्रज्ञानाचे स्वागत केले.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे तसेच हंगेरी देशाचे कौन्सिल जनरल फ्रेंक जारी यांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, प्रवास अधिक आनंददायी करण्यासाठी ही अभिनव कल्पना राबवण्यात आली आहे. विशेष हंगेरियन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेल्या रस्त्यावरील रिब्स किंवा पट्ट्यांमुळे वाहनाच्या वेगानुसार संगीत निर्माण होते. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांना प्रवासादरम्यान वेगळा अनुभव मिळतो.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ५०० मीटर अंतरावर हे संगीतमय पट्टे बसवण्यात आले आहेत. पुढील काळात या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्याबाबतही प्रशासन विचार करत असल्याची माहिती देण्यात आली.
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पामुळे वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होत असताना, संगीतमय रस्त्यामुळे आता या मार्गाची ओळख राष्ट्रीय पातळीवर एक अनोखा उपक्रम म्हणून निर्माण होणार आहे. प्रवासात नव्या तंत्रज्ञानाची जोड देत हा प्रकल्प मुंबईकरांसाठी आणखी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.










