२९.४.२०२३ म्हणजेच आज ‘जागतिक नृत्य दिन’ आहे. त्या निमित्ताने…
‘नृत्यकला ही केवळ मनुष्याला आनंद देणारी आहे’, असे नाही, तर ती पशू-पक्ष्यांना आणि इतर जीवसृष्टीलाही तितकीच हर्षोल्हसित करते. नृत्यकलेमध्ये भगवंताला स्पर्श करण्याचे सामर्थ्य आहे. शिव आणि शक्ती यांच्या नृत्यामुळे विश्वाची उत्पत्ती, स्थिती अन् लय होतो. त्यामुळे नृत्य अनादि काळापासून चालू आहे. भगवान शिवाच्या आंगिक हालचाली आणि पदन्यास यांनी अवघ्या विश्वाला व्यापले असून तेच सृष्टीचे चैतन्य आहे. शिवाचे मुख आणि डमरू यांतून निघणारा नाद अवघ्या सृष्टीचे साहित्य (वाङ्मय) आहे. ‘चंद्र आणि तारे ज्याचे अलंकार आहेत’, अशा सत्यम्, सुंदर अन् सात्त्विक शिवाला माझा नमस्कार असो !
भारतीय परंपरेने नृत्यकलेची आद्यदेवता म्हणून नटराज शिवशंकराची सदैव आराधना केली आहे. भारतीय नृत्यकला आणि तिची संस्कृती पुष्कळ प्राचीन आहे. नृत्य, गायन आणि वादन, म्हणजेच ‘संगीता’ला त्या वेळी मोक्षप्राप्तीचे साधन मानले जायचे.
‘द्वारकामाहात्म्य’ या ग्रंथात म्हटले आहे,
यो नृत्यति प्रहृष्टात्मा भावैः अत्यन्तभक्तितः ।
स निर्दहति पापानि जन्मान्तरशतैरपि ॥ – स्कंदपुराण, खंड ७, द्वारकामाहात्म्य, अध्याय २३, श्लोक ७४
अर्थ : जो प्रसन्नचित्ताने, श्रद्धा आणि भक्ती पूर्वक, तसेच भावांसह नृत्य करील, तो जन्मजन्मांतरीच्या शेकडो पापांतून मुक्त होईल.
साचेबंद आणि लयपूर्ण शारीरिक हालचाली, शरीर अन् श्वास यांवर ठेवावे लागणारे नियंत्रण, विविध शारीरिक आकृतीबंध (पोश्चर), अशा अनेक गोष्टी नृत्ययोगामध्ये आवश्यक असतात; परंतु शारीरिक स्वास्थ्यासह मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवरील स्वास्थ्यही नृत्यामुळे मिळवता येते.
शारीरिक लाभ – नृत्यामध्ये शरिराच्या हालचालींचा समावेश असल्याने आपल्याला घाम येऊन आपले वजन घटते. नृत्य आपल्या शरिरातील रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होण्यास साहाय्य करते. त्यामुळे अनेक आजार होणे टळते, तसेच त्वचेची गुणवत्ता सुधारते. शास्त्रीय नृत्यांतील हस्तमुद्रा, तसेच हालचाली करण्याच्या पद्धतींमुळे शरिराचे स्नायू आणि हातांची बोटे यांना कोणतीही हानी न पोचता हळूवार व्यायाम मिळतो. नृत्य शिकणार्या लहान मुलींचा मेंदू, मन आणि अवयव यांच्यातील समन्वय वाढण्यास साहाय्य होते. शास्त्रीय नृत्यातील ‘तोडे, अडवू, नवरस’, असे प्रकार करतांना हावभावांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे चेहर्याच्या स्नायूंना उत्तम व्यायाम मिळतो. शास्त्रीय नृत्यातील हस्तक आणि पदन्यास करतांना हात अन् पाय या दोन्हींकडे योग्य लक्ष देणे, तसेच त्यांचा ताळमेळ साधणे आवश्यक असते. त्यामुळे एकाग्रता वाढण्यास साहाय्य होते.
मानसिक लाभ – नृत्याचे सादरीकरण करण्यातून आत्मविश्वास वाढल्याने कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाने करण्यासाठी निश्चितच साहाय्य होते. नृत्य केल्याने आपल्याला तणावातून बाहेर पडता आल्याने काही काळासाठी आपण ताण विसरून जातो. ‘नैराश्य, स्किझोफ्रेनिया, मूड डिसऑर्डर’, अशा मानसिक आजारांसाठी; तसेच लहान मुलांमधील अतीचंचलता (ADHD- Attention deficit hyperactive disorder), आत्मकेंद्रितपणा (Autism), अशा विविध समस्यांसाठी नृत्योपचाराचा वापर होतो.
आध्यात्मिक लाभ – मनाला शरिराशी, आत्म्याला परमात्म्याशी, कलेला भक्तीशी आणि कलाकारांना प्रेक्षकांशी जो जोडून ठेवतो, त्या सर्वांमध्ये ‘योग’ समाविष्ट आहे. नृत्याचे आदिदैवत असलेल्या भगवान नटराजाचे वर्णन ‘नृत्ययोगी’, असे केले जाते. ‘कूर्मपुराणा’त स्वतः शिवाने स्वतःचे वर्णन ‘मी गिरिकंदात रहाणारा योगी आहे आणि नादांत नृत्य साकारणारा नर्तकही आहे’, अशा समर्पक शब्दांत केले आहे. ‘नृत्य’ हासुद्धा योगाची अनुभूती देणारा एक उत्तम मार्ग आहे. जेव्हा आपल्याला योग साधता येतो, तेव्हा आपण मनाने आपोआपच स्थिर होऊन सत्त्वगुणाकडे वळतो. त्यामुळे आपल्या ध्येयावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष्य केंद्रित करता येऊ शकते आणि आत्मिक आनंदाची प्रचीती येते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण नृत्यामध्ये भान विसरून तल्लीन होतो, तेव्हा याच आत्मिक आनंदाची अनुभूती स्वतः नर्तक अथवा नर्तिका यांच्या समवेत प्रेक्षकांना येते.
जागतिक नृत्य दिन’ साजरा करणे’, ही कौतुकास्पद गोष्ट आहे; परंतु जर त्याचा अवलंब दैनंदिन वापरात केला, तरच त्याला अर्थ प्राप्त होईल. साधकाने नृत्य अथवा त्याची कला यांची आराधना नियमित, नित्यनेमाने, संपूर्ण एकाग्रतेने आणि चित्त केंद्रित करून केली, तर नृत्ययोग साधता येऊ शकतो.
संदर्भ – सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर (नृत्य अभ्यासिका), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२४.४.२०२३)