Notice to ST Corporation of Nashik Municipality
Notice to ST Corporation of Nashik Municipality

नाशिक – मुंबईत घाटकोपर येथे वादळी वाऱ्यामुळे लोखंडी होर्डिंग्ज पेट्रोलपंपावर कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक मनपा देखील अलर्ट मोडवर आली असून, शहरातील सात ठिकाणी एसटी महामंडळाच्या जागेत धोकादायक होर्डिंग्ज लावल्या आहे. त्या कधीही कोसळून दुर्घटना होण्याची भीती आहे. त्यामुळे या होर्डिंग्ज तात्काळ हटवण्यात याव्यात या संदर्भात मनपाच्या कर व जाहिरात विभागाने एसटी महामंडळाला नोटीस काढली आहे.

शहरातील खासगी जागेवरील होर्डिंगचे आठ महिन्यांपूर्वीच त्रयस्थ संस्थेकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले आहे. ८५६ पैकी १६ होर्डिंग्जचे स्ट्रक्चर धोकेदायक होते. ते काढण्यात आले. उर्वरित स्ट्रक्चर मजबूत असल्याचा अहवाल ऑडिट करणाऱ्या संस्थेने दिला. मात्र, शहरात एसटी महामंडळाच्या बसस्थानकातील अनेक होर्डिंग्ज धोकेदायक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेचे याकडे लक्ष नाही, असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत होता. सीबीएस, महामार्ग व पंचवटी डेपोत एसटी महामंडळाच्या धोकेदायक होर्डिंग्ज आहेत. त्या महामंडळाने काढून घ्याव्यात. यासाठी महामंडळाला पत्रव्यवहारही केला असून, नुकतीच नोटीस बजावली आहे.