रामनवमी हा उत्सव चैत्र शुद्ध नवमी या तिथीला साजरा करतात. श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ रामनवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत रामचंद्रांचा जन्म झाला. देवता अन् अवतार यांच्या जन्मतिथीला त्यांचे तत्त्व भूतलावर जास्त प्रमाणात कार्यरत असते. या दिवशी श्रीरामतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. रामनवमीला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप, तसेच श्रीरामाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीरामतत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होते.

‘कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध शृंगार, अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. माध्यान्हकाळी, कुंची (बाळाच्या डोक्याला बांधायचे एक वस्त्र. हे वस्त्र पाठीपर्यंत असते.) घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हालवतात आणि भक्तमंडळी त्यावर गुलाल अन् फुले उधळतात. (काही ठिकाणी नारळाऐवजी श्रीरामाची मूर्ती पाळण्यात ठेवतात. – संकलक याप्रसंगी श्रीरामाचा पाळणा (रामजन्माचे गीत) म्हटला जातो.’ त्यानंतर श्रीरामाच्या मूर्तीची पूजा करतात आणि प्रसाद म्हणून सुंठवडा देतात. काही ठिकाणी सुंठवड्याबरोबर महाप्रसादही देतात.

‘त्रेतायुगात जेव्हा रामजन्म झाला, तेव्हा कार्यरत असलेला श्रीविष्णूचा संकल्प, त्रेतायुगातील अयोध्यावासियांचा भक्तीभाव अन् पृथ्वीवरील सात्त्विक वातावरण यांमुळे ‘प्रभू श्रीरामाच्या जन्माच्या घटनेचा परिणाम १०० टक्के झाला होता. त्यानंतर प्रत्येक वर्षी येणार्‍या चैत्र शुद्ध नवमीला ब्रह्मांडातील वातावरणात रामतत्त्वाचे प्रक्षेपण करून वातावरण सात्त्विक आणि चैतन्यमय बनवण्यासाठी विष्णुलोकातून श्रीरामतत्त्वयुक्त विष्णुतत्त्व भूलोकाच्या दिशेने प्रक्षेपित होते आणि त्या दिवशी श्रीरामाचा अंशात्मक जन्म होतो. त्याचा परिणाम वर्षभर होऊन ब्रह्मांडात रामतत्त्वयुक्त सात्त्विकता आणि चैतन्य यांचे प्रक्षेपण होते. रामतत्त्वयुक्त सात्त्विकता आणि चैतन्य ब्रह्मांडातील प्रत्येक सजीव आणि निर्जीव ग्रहण करतात आणि त्यामुळे ते त्यांचे कार्य चांगल्या प्रकारे करू शकतात.

आदर्श पुत्र

रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे पालन केले; पण प्रसंगी वडीलधार्‍यांनाही उपदेश केला आहे, उदा. वनवासप्रसंगी आईवडिलांनाही त्याने ‘दुःख करू नका’ असे सांगितले. ज्या कैकेयीमुळे रामाला १४ वर्षे वनवास घडला, त्या कैकेयीमातेला वनवासाहून परतल्यावर राम नमस्कार करतो आणि पहिल्याप्रमाणेच तिच्याशी प्रेमाने बोलतो.

आदर्श बंधू

अजूनही आदर्श अशा बंधुप्रेमाला राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात.

आदर्श पती

श्रीराम एकपत्‍नीव्रती होता. सीतेचा त्याग केल्यावर श्रीराम विरक्‍तपणे राहिला. पुढे यज्ञासाठी पत्‍नीची आवश्यकता असतांना दुसरी पत्‍नी न करता त्याने सीतेची प्रतिकृति आपल्याशेजारी बसविली. यावरून श्रीरामाचा एकपत्‍नी बाणा दिसून येतो. त्या काळी राजाने बर्‍याच राण्या करण्याची प्रथा होती. या पार्श्‍वभूमीवर श्रीरामाचे एकपत्‍नीव्रत प्रकर्षाने जाणवते.

आदर्श मित्र

रामाने सुग्रीव, बिभीषण इत्यादींना त्यांच्या संकटकाळात साहाय्य केले.

आदर्श राजा

राजधर्माचे पालन करण्यात तत्पर

प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्‍त केल्यावर त्याने आपल्या वैयक्‍तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्‍नीचा त्याग केला. याविषयी कालिदासाने ‘कौलिनभीतेन गृहन्निरस्ता न तेन वैदेहसुता मनस्तः ।’ (अर्थ : लोकापवादाच्या भयाने श्रीरामाने सीतेला घरातून बाहेर घालविले, मनातून नाही.) असा मार्मिक श्‍लोक लिहिला आहे.

आदर्श शत्रू

रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’

धर्मपालक

श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या; म्हणूनच त्याला ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हणतात.

एकवचनी

अ. एखादा मुद्दा सत्य आहे, असे ठासून सांगायचे असल्यास आपण तो पुनःपुन्हा सांगतो, ‘मी त्रिवार सत्य सांगतो’ असे म्हणतो. ‘शांतिः । शांतिः । शांतिः ।’ असेही तीन वेळा म्हणतात. त्रिवार सत्यमधील त्रिवार हा शब्द पुढील दोन अर्थांनी वापरलेला आहे.

१. ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची शपथ घेऊन सांगतो.

२. त्रिवार हा शब्द त्रि ± वार (म्हणजे तीन वार) या शब्दांपासून बनला आहे. तीन वारी तेच स्वप्न दिसले तर त्याला नुसते स्वप्न न म्हणता स्वप्नदृष्टान्त असे म्हणतात. त्यातील सूचनेनुसार वागावे किंवा त्या संदर्भात एखाद्या उन्नतांना विचारावे. तसेच तीन वेळा एखादी गोष्ट ऐकली, तरच ती सत्य समजावी.

श्रीराम मात्र एकवचनी होता, म्हणजे त्याने एकदा काही म्हटले की ते सत्यच असायचे. तो मुद्दा पुनःपुन्हा ठासून तीन वेळा सांगायची जरूर नसायची. कोणी श्रीरामालाही विचारायचे नाही, ‘खरंच का ?’

आ. संस्कृत व्याकरणात एकवचन, दि्ववचन आणि बहुवचन अशी तीन वचने आहेत. त्यात श्रीराम हा ‘एकवचनी’ आहे. याचा अर्थ असा की, श्रीरामाशी एकरूप होणे, म्हणजे तीनकडून (अनेकाकडून) दोघांच्या, म्हणजे गुरु आणि शिष्य या दोघांच्या नात्यातून एकाकडे, म्हणजे श्रीरामाकडे जाणे. अनेकातून एकाकडे आणि एकातून शून्याकडे जाणे अशी अध्यात्मात प्रगती असते. येथे शून्य म्हणजे पूर्णावतार कृष्ण होय.

इ. भूमितीनुसार तीन हा त्रिमिती (तीन डायमेन्शन्स) दर्शवितो, तर श्रीराम एका मितीचा दर्शक आहे. या एका मितीतून त्रिमिती निर्माण झाली आहे. ही एक मिती स्थल-कालातीत आहे.

एकबाणी

श्रीरामाचा एकच बाण लक्ष्य वेधीत असल्याने त्याला दुसरा बाण मारावा लागत नसे.

अती उदार

सुग्रीवाने रामाला विचारले, ‘‘बिभीषण शरण आल्यावर तुम्ही त्याला लंकेचे राज्य दिले. (युद्धाला सुरुवात होण्यापूर्वीच रामाने तसे सांगितले होते.) आता रावण शरण आला, तर काय करणार ?’’ त्यावर राम म्हणाला, ‘‘त्याला अयोध्या देईन. आम्ही सर्व भाऊ जंगलात रहायला जाऊ.’’

सदैव स्थितप्रज्ञ असलेला

स्थितप्रज्ञता हे उच्च आध्यात्मिक पातळीचे लक्षण आहे. श्रीरामाची स्थितप्रज्ञावस्था पुढील श्‍लोकावरून लक्षात येते.

प्रसन्नता न गतानभिषेकतः तथा न मम्ले वनवासदुःखतः ।
मुखाम्बुजश्री रघुनंदनस्य या सदास्तु मे मंजुल मंजुलमंगलप्रदा ।।

अर्थ : राज्याभिषेकाची वार्ता ऐकून जिच्यावर प्रसन्नता उमटली नाही आणि वनवासाचे दुःख पुढे उभे राहिले असताही जिच्यावर विषण्णता पसरली नाही, ती श्रीरामाची मुखकांति आमचे नित्यमंगल करो.

गीतेच्या परिभाषेत यालाच ‘न उल्हासे, न संतापे । त्याची प्रज्ञा स्थिरावली ।।’ असे म्हटले आहे.

श्रीरामाची पूजा

श्रीरामाची पूजा करतांना त्याला करंगळीजवळच्या बोटाने, म्हणजेच अनामिकेने गंध लावावे. तसेच श्रीरामाला हळद-कुंकू वहातांना आधी हळद अन् नंतर कुंकू, उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणांवर वाहावे. अंगठा आणि अनामिका जोडून तयार होणार्‍या मुद्रेमुळे पूजकाच्या देहातील अनाहतचक्र जागृत होते. त्यामुळे पूजकामध्ये भक्‍तीभाव निर्माण होण्यास साहाय्य होते.

श्रीरामाला वाहायची विशिष्ट फुले

केवडा
केवडा

विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत जास्त असते. श्रीरामाला केवडा, चंपा, चमेली अन् जाई ही फुले वाहावीत.

या फुलांच्या गंधामुळे श्रीरामाचे तत्त्व मूर्तीत अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत अन् विशिष्ट रचना करून वाहिल्यास, फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार श्रीरामाला फुले वाहातांना ती चार किंवा चारच्या पटीत वाहावीत.

श्रीरामाच्या उपासनेत वापरायची उदबत्ती

विशिष्ट देवतेचे तत्त्व विशिष्ट गंधाकडे लवकर आकृष्ट होते. केवडा, चंपा, चमेली, जाई, चंदन, वाळा आणि अंबर या गंधांकडे रामतत्त्व लवकर आकृष्ट होते. यामुळे या गंधांच्या उदबत्त्या श्रीरामाच्या उपासनेत वापरल्यास रामतत्त्वाचा लाभ जास्त प्रमाणात होतो.

श्रीरामासह सर्व देवतांना भक्‍तीच्या पहिल्या टप्प्यात दोन उदबत्त्यांनी ओवाळणे अधिक योग्य आहे. तर भक्‍तीच्या पुढच्या टप्प्यात देवतेला एका उदबत्तीने ओवाळावे. देवतेला ओवाळतांना उदबत्ती उजव्या हाताची तर्जनी म्हणजे अंगठ्याजवळचे बोट आणि अंगठा यांनी धरून ती घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने तीन वेळा ओवाळावी.

श्रीरामाला घालावयाच्या प्रदक्षिणा

श्रीरामाच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर चार प्रदक्षिणा घालाव्यात. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चारही आश्रमांचे आदर्शरीत्या पालन करणारा राजा म्हणजे श्रीराम; म्हणून श्रीरामाच्या देवळात दर्शन घेतल्यानंतर श्रीरामाला चार प्रदक्षिणा घालाव्यात. प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवतेला नमस्कार करून मगच पुढची प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा अधिक संख्येत घालायच्या असल्यास त्या शक्यतो किमान प्रदक्षिणेच्या संख्येच्या म्हणजे चारच्या पटीत घालाव्यात. प्रदक्षिणा घातल्याने कोणत्याही देवतेकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य अल्प कालावधीत संपूर्ण देहात संक्रमित होते.

संदर्भ : सनातन निर्मित ग्रंथ ‘श्रीराम’