पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी संयुक्त राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या उच्चस्तरीय खुल्या चर्चेचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. “सागरी सुरक्षा वाढ आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य”, या विषयांवरील या खुल्या चर्चेत सागरी गुन्हेगारी आणि असुरक्षिततेचा प्रभावीपणे सामना करण्याच्या उपायांवर तसंच सागरी क्षेत्रामधला समन्वय भक्कम करण्यावर भर दिला जाईल.
अनेक राष्ट्रप्रमुख तसंच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि प्रमुख प्रादेशिक संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या वेबसाइटवर थेट प्रसारित केला जाणार आहे.
भारतीय पंतप्रधान हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेचे अध्यक्ष असण्याची तसंच सागरी सुरक्षेचा हा विशेष मुद्दा घेऊन समग्र पद्धतीने त्यावर उच्च स्तरावर चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे.