भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध विश्‍वास अन् भागीदारी यांच्यावर आधारित ! – पंतप्रधान मोदी  

11

सिडनी (ऑस्ट्रेलिया) – भारत-ऑस्ट्रेलिया संबंध ‘क्रिकेट’, ‘कॉमनवेल्थ’ (राष्ट्रकुल) आणि ‘करी’ (आमटी) या तिन्ही ‘सी’वर अवलंबून होते. आता आम्ही परस्परांवरील विश्‍वास आणि भागीदारी (पार्टनरशिप) यांद्वारे एकत्र आलो आहोत, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सहस्रो अनिवासी भारतियांच्या कार्यक्रमात केले.या वेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज हेही उपस्थित होते. या वेळी मोदी यांनी भारत-ऑस्ट्रेलिया संबंध, भारतीय संस्कृती, भारताची प्रगती यांसह अनेक सूत्रांवर मार्गदर्शन केले. त्यांनी ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरात भारतीय उच्चायुक्तालय उघडण्यात येणार असल्याचीही घोषणा केली. पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनापूर्वी येथे भारताची संस्कृती दर्शवणारा कार्यक्रम भारतीय कलाकारांनी सादर केला. ऑस्ट्रेलियात मोदी यांच्या उपस्थितीत हॅरिस पार्क परिसराचे नाव ‘लिटिल इंडिया’ असे ठेवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज या वेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, येथे प्रथमच एखाद्या भारतीय नेत्याचे इतके भव्य स्वागत करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी माझे फार चांगले मित्र आहेत. दोन्ही देश त्यांच्या लोकशाही मूल्यांच्या आधारे संबंध अधिक दृढ करतील.