प्रत्येकालाच अगदी घराच्या सज्जातही लावता येतील, अशा निवडक औषधी वनस्पती (herbs)

6

शहरातील बहुतेक लोक सदनिकांमध्ये किंवा भाड्याच्या खोल्यांमध्ये रहात असल्याने त्यांना औषधी वनस्पतींची herbs लागवड करणे शक्य होत नाही. अशा स्थितीत पुढील १० वनस्पतींची कुंड्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये लागवड करून त्या वनस्पती घराच्या सज्जामध्ये (बाल्कनीत) ठेवता येतील. यांपैकी गुळवेल, जाई, विड्याच्या पानांची वेल आणि कांडवेल या वनस्पतींना वाढीसाठी आधाराची आवश्यकता असते. यासाठी या वेली कुंडीमध्ये लावून सज्जाच्या गजांवर सोडाव्यात. या १० वनस्पती मिळून बहुतेक रोगांवर उपयुक्त असल्याने प्रत्येकानेच या वनस्पती आपल्या भोवताली लावाव्यात. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे, त्यांनी अशा वनस्पती घरात न लावता घराभोवती लावाव्यात. यांतील वेली परसातील मोठ्या झाडाच्या (शक्यतो कडुनिंबाच्या) मुळाशी किंवा कुंपणावर लावाव्यात.

तुळस – तुळशीचे बी किंवा खोडाचे छाट लावतात.

तुळशीची पाने सावलीत वाळवून त्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करावे. यातील चिमूटभर चूर्ण तपकिरीप्रमाणे नाकाने ओढावे. सर्दी लगेच न्यून होते.

तुळशीच्या पानांचा रस जखमेवर लावावा.

कान दुखत असल्यास तुळस आणि माका यांची पाने एकत्र वाटून त्याचे २ – २ थेंब कानात घालावेत किंवा केवळ तुळशीचा २ थेंब रस कानात घालावा.

दम्या मध्ये प्रतिदिन सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची ४ पाने चावून खावीत.

भूक लागत नसल्यास तुळशीची ४ पाने आणि खडीसाखर एकत्र करून जेवणाच्या अर्ध्या घंट्याआधी चावून खावीत.

दुर्वा – दुर्वा लागवडीसाठी मूळ असलेला तुकडा वापरतात

डोकेदुखी मध्ये दूर्वांच्या रसात कापराची पूड घालून त्याचा कपाळावर लेप लावावा. नाकाचा घुळणा फुटल्यास २ – २ थेंब दूर्वांचा रस नाकाच्या मधल्या पडद्यावर दोन्ही बाजूंनी घालावा. वाईट स्वप्न पडत असल्यास रात्री झोपतेवेळी १ वाटी दूर्वांचा रस प्यावा.

झेंडू – वाळलेल्या फुलांच्या पाकळ्या कुंडिमध्ये लावू शकतात.

व्रण लवकर भरून येत नसल्यास त्यावर झेंडूच्या पाल्याचा रस लावावा किंवा दूर्वांच्या तेलाप्रमाणेच झेंडूच्या पानाचे तेल करून त्या तेलामध्ये कापूस बुडवून तो व्रणावर ठेवावा आणि पट्टी बांधावी. त्वचेवर पित्त उठल्यास झेंडूची फुले आणि पाने यांचा रस अंगाला चोळावा.

कालमेघ – लागवडीसाठी बी वापरतात.

कोणत्याही प्रकारच्या तापामध्ये मूठभर कालमेघ आणि पाव चमचा सुंठीची पूड २ पेले पाण्यात घालून एक पेला पाणी राहीपर्यंत उकळून काढा करावा. हा काढा अर्धा – अर्धा पेला सकाळ – संध्याकाळ घ्यावा. वाळलेल्या कालमेघाची पूड करून ठेवावी. घशात किंवा छातीत जळजळ होत असल्यास अर्धा चमचा कालमेघाची पूड अर्धा चमचा साखरेसह चघळून खावी.

पानफुटी – पान किंवा खोडाचे छाट लावतात.

मूतखडा झाल्यास सकाळ – संध्याकाळ पाव कप पानफुटीच्या पानांचा रस घ्यावा. पानफुटीची पाने ठेचून आग होत असलेल्या भागावर बांधावीत.

कोरफड – मुळाशी येणारे मुनवे लावतात.

श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास २ – २ घंट्यांनी चमचाभर कोरफडीचा रस चमचाभर मध आणि अर्धा चमचा तूप घालून द्यावा. यामुळे शौचास साफ होते आणि दम लागणे थांबते. आम्लपित्त झाल्यास २ चमचे कोरफडीचा रस चवीपुरती खडीसाखर घालून घ्यावा. कोरफडीच्या गरात हळद घालून भाजलेल्या ठिकाणी लावावे. यामुळे भाजलेल्या ठिकाणी जंतूसंसर्ग होत नाही, तसेच थोडेसे भाजले असल्यास त्याचा डागही रहात नाही.

गुळवेल – खोडाचे छाट लावतात

ताप : कोणत्याही प्रकारच्या तापात गुळवेलीचा बोटभर लांबीचा तुकडा ठेचून त्याचा काढा करून घ्यावा. कावीळ : आठवडाभर अर्धी वाटी गुळवेलीचा रस अर्धा चमचा खडीसाखर घालून प्रतिदिन सकाळी रिकाम्या पोटी घ्यावा.

जाई – खोडाचे छाट लावतात

तोंड येणे : जाईची पाने वरचेवर चावून थुंकावीत. व्रण : कोणत्याही प्रकारच्या व्रणावर जाईचा पाला वाटून व्रणाची जागा भरेल असा बसवावा किंवा दूर्वांच्या तेलाप्रमाणेच जाईच्या पानांचे तेल करून त्या तेलामध्ये कापूस बुडवून तो व्रणावर ठेवावा आणि पट्टी बांधावी. व्रण लगेच भरून येतो.

पानवेल (विड्याच्या पानांची वेल) – खोडाचे छाट लावतात

घशामध्ये कफ दाटणे : विडा खावा. भूक न लागणे, सर्दी, कॉलेस्टेरॉल वाढणे, कॅल्शिमची न्यूनता असणे : प्रतिदिन विडा खावा.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘औषधी वनस्पतींची लागवड करा !’