बुलढाणा – येथे झालेल्या खासगी बसच्या अपघातानंतर पोलिसांनी बसचालक दानिश शेख इस्माईल याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. अपघाताविषयी पोलिसांची दिशाभूल केल्याचा आणि टायर फुटल्याविषयी खोटे बोलल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी त्याला अटक करून ताब्यात घेतले आहे. बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर बसगाडीने पेट घेतल्याने झालेल्या अपघातात २५ प्रवासी मृत्यूमुखी पडले होते.
अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर चालकाने टायर फुटल्याचा केलेला दावा खोटा असल्याचे कार्यालयाने सांगितले. घटनास्थळावरून रबराचे तुकडे मिळाले नाहीत. लोकांनी दिलेल्या माहितीवरून हा अपघात मानवी चुकांमुळे झाल्याचे दिसते. चालकाला झोप लागल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे.