‘सिर्फ एक बंदा काफी है’ चित्रपटाच्या निर्मात्याला ‘आसाराम बापू ट्रस्ट’कडून नोटीस

9

अभिनेते मनोज वाजपेयी यांचा आगामी ‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटाचा ८ मे या दिवशी विज्ञापन (ट्रेलर) प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्याला ‘आसाराम बापू ट्रस्ट’ने नोटीस पाठवली आहे. ट्रस्टकडून न्यायालयात याचिका प्रविष्ट करून या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. ‘या चित्रपटामध्ये आसाराम बापू यांंच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवण्यात आला आहे’, असे ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे. या चित्रपटात एका बाबाने १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपटात दिसणार्‍या बाबाची वेशभूषा ही पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांच्याशी मिळतीजुळती आहे. त्यावरून हा चित्रपट त्यांच्याशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.

या चित्रपटाचे निर्माते आसिफ शेख यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही अधिवक्ता पी.सी. सोलंकी यांच्या जीवनावर चित्रपट बनवला आहे. त्यासाठी आम्ही त्यांच्याकडून सर्व हक्कही खरेदी केले आहेत. आम्हाला नोटीस मिळाली हे खरे आहे. या नोटिसीला आमचे अधिवक्ता उत्तर देतील.’ पी.सी. सोलंकी हे पूज्यपाद संतश्री आसाराम बापू यांच्या विरोधातील खटल्यात फिर्यादीचे अधिवक्ते होते.