मुंबई : नसरापूर येथे घडलेल्या अल्पवयीन बालिकेवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी या प्रकरणात तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचा सरकारचा निर्धार स्पष्ट केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, २ मे रोजी त्यांनी पीडितेच्या वडिलांशी दोन वेळा संवाद साधून प्रकरणाची माहिती घेतली. तसेच, या प्रकरणात वेळेत आरोपपत्र दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सरकारने न्यायालयालाही अधिकृत पत्र पाठवले आहे.
या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, अगदी मृत्यूदंड मिळावा यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. “लोकशाही व्यवस्थेत कायद्याच्या चौकटीत राहूनच न्याय दिला जातो. मात्र, अशा अमानुष कृत्य करणाऱ्याला योग्य ती शिक्षा मिळावी, यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून समाजाच्या सर्व स्तरांतून निषेध नोंदवला जात आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, नागरिकांचा रोष स्वाभाविक आहे; कारण ही घटना अत्यंत संवेदनशील आणि गंभीर आहे.
तसेच, काही घटक या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. अशा अफवा किंवा चुकीच्या माहितीपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
सरकारकडून या प्रकरणाची जलदगतीने सुनावणी होऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.





