महाराष्ट्रात मे महिन्यात एक अनोखी आणि दुर्मिळ खगोलीय घटना पाहायला मिळणार आहे. ‘शून्य सावली’ (Zero Shadow Day) म्हणून ओळखली जाणारी ही घटना ३ मेपासून सुरू होऊन ३१ मेपर्यंत राज्यातील विविध भागांत अनुभवता येणार आहे. या काळात काही क्षणांसाठी कोणत्याही उभ्या वस्तूची सावली पूर्णपणे अदृश्य होताना दिसेल.
ही घटना तेव्हा घडते जेव्हा सूर्य अगदी डोक्यावर, म्हणजेच ९० अंशांच्या कोनात येतो. अशा वेळी वस्तूंची सावली त्यांच्या पायाखाली येते किंवा पूर्णपणे दिसेनाशी होते. पृथ्वीचा अक्ष थोडा कललेला असल्यामुळे कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यान असलेल्या भागांमध्ये हा विशेष अनुभव वर्षातून दोनदा घडतो.
यावर्षी या घटनेची सुरुवात ३ मे रोजी सावंतवाडी येथे होणार आहे. त्यानंतर राज्यातील इतर शहरांमध्येही हा अनुभव वेगवेगळ्या तारखांना घेता येईल. १३ मे रोजी पुणे परिसरात, १५ मे रोजी मुंबई आणि नवी मुंबईत, २६ मे रोजी नागपूर व भंडारा येथे, तर ३१ मे रोजी तोरणमाळ आणि धुळे येथे या घटनेचा शेवट होईल.
दरम्यान, हा अनुभव दुपारी सुमारे १२ ते १२.३५ या वेळेत पाहता येतो. या काळात नागरिकांनी उभ्या वस्तूंची सावली पाहून हा नैसर्गिक चमत्कार अनुभवावा, असे आवाहन तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.
खगोलशास्त्रात रस असणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक खास क्षण असून, विद्यार्थ्यांसाठीही ही घटना प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान समजून घेण्याची उत्तम संधी ठरणार आहे. तसेच, अशा घटनांमुळे सूर्याच्या हालचाली आणि पृथ्वीच्या रचनेबद्दल अधिक माहिती मिळण्यास मदत होते.






