मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

ई-बाईक टॅक्सीला परवानगी

राज्य मंत्रिमंडळाने ई-बाईक टॅक्सीला (E-bike taxis) परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या सेवा नियमांच्या चौकटीत राहून कार्यान्वित होणार आहेत. विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे.

टोलवसुलीबाबत महत्त्वाचा निर्णय

पुणे-शिरूर-अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर या राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) टोलवसुली केली जाणार आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व वाहनांना टोल द्यावा लागणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या अन्य महत्त्वाच्या निर्णयांची यादी:

  • वाहन कर सवलत: नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रामध्ये स्वेच्छेने निष्कासित केलेल्या वाहनांसाठी सुधारित कर सवलत लागू.
  • बाईक टॅक्सी धोरण: एक लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये लागू करण्याचा निर्णय.
  • रमानाथ झा समिती: शिफारशी सुधारणेसह लागू करण्याचा निर्णय.
  • नागन मध्यम प्रकल्प, नंदूरबार: प्रकल्पासाठी १६१.१२ कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता.
  • सिंदफणा नदीवरील प्रकल्प:
    • निमगाव (ता. शिरूर, बीड) बंधाऱ्याच्या विस्तार व सुधारणा अंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरणासाठी २२.०८ कोटी रुपये मंजूर.
    • ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरूर, बीड) बंधाऱ्याच्या विस्तार व सुधारणा अंतर्गत बॅरेजमध्ये रूपांतरणासाठी १७.३० कोटी रुपये मंजूर.
  • वडसा-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे प्रकल्प:
    • एकूण खर्च: १८८६.५ कोटी रुपये
    • राज्य सरकारचा वाटा: ९४३.०२५ कोटी रुपये (५०%)
  • पुणे-शिरूर-अहिल्यानगर महामार्ग सुधारणा: रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या २००८ पथकर धोरणानुसार सर्व वाहनांवर टोल लागू.
  • नागपूर (अजनी) देवनगर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी: क्रीडांगण आरक्षण रद्द करून रहिवासी क्षेत्रात रूपांतर करण्याचा निर्णय.
  • ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका:
    • ५०० शेतकऱ्यांना धानासाठी पणन हंगाम २०२०-२१ करिता ७९.७१ लाख रुपयांचे अनुदान मंजूर.

या निर्णयांमुळे राज्याच्या विविध क्षेत्रांमध्ये विकासाला चालना मिळेल.