वणी येथील सप्‍तशृंगी मंदिरात वस्‍त्रसंहिता लागू होण्‍याविषयी १५ जूनला विश्‍वस्‍तांची महत्त्वपूर्ण बैठक !

9

नाशिक – जिल्‍ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्‍थान असलेल्‍या ‘वणीच्‍या श्री सप्‍तशृंगीदेवी मंदिरात वस्‍त्रसंहिता लागू करायची कि नाही ?’ याविषयी १५ जून या दिवशी सप्‍तशृंगी निवासिनी संस्‍थानचे नवनियुक्‍त अध्‍यक्ष आणि अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश बी.व्‍ही. वाघ यांच्‍या उपस्‍थितीत मंदिरांच्‍या विश्‍वस्‍तांची बैठक संस्‍थान कार्यालयात पार पडणार आहे. सद्य:स्‍थितीत वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याविषयीचा ठराव वणी ग्रामपंचायतीकडून मंदिर प्रशासनाकडे सुपुर्द करण्‍यात आला आहे. आता मंदिराचे विश्‍वस्‍त काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

गेल्‍या अनेक दिवसांपासून राज्‍यातील विविध मंदिरांमध्‍ये वस्‍त्रसंहिता लागू करण्‍यासंदर्भात निर्णय घेण्‍यात येत आहेत. याचे अनेकांनी स्‍वागत केले आहे. साडेतीन शक्‍तीपिठांपैकी अर्धपीठ, तसेच खानदेशची कुलदेवता म्‍हणून वणीच्‍या श्री सप्‍तशृंगीदेवीची ओळख असून या मंदिरातही वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याविषयी चर्चा चालू आहे. वणी ग्रामपंचायतीने २९ मे या दिवशीच्‍या मासिक बैठकीत ‘वस्‍त्रसंहिता लागू करण्‍यात यावी’, असा ठराव करून मंदिर विश्‍वस्‍तांकडे दिला आहे. ग्रामस्‍थांसमवेत पुरोहित संघानेही या निर्णयाचे स्‍वागत केले होते. ‘देवीच्‍या दर्शनासाठी येतांना महिलांसमवेत पुरुषांनी पूर्ण पेहराव परिधान करावा’, असे या ठरावात नमूद करण्‍यात आले होते. तथापि मंदिर समितीकडून ‘वस्‍त्रसंहिता लागू करण्‍याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही’, असे स्‍पष्‍ट करण्‍यात आले होते.