सिकंदराबाद (तेलंगाणा) – देशातील आर्थिक परिस्थिती आणि जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काही गोष्टींमध्ये संयम पाळण्याची गरज असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. सिकंदराबाद येथे आयोजित सभेत बोलताना त्यांनी नागरिकांना पुढील एक वर्ष लग्नासाठी सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले. तसेच, परदेश दौरे कमी करून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात नागरिकांनी ‘वर्क फ्रॉम होम’, ऑनलाईन बैठका आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांसारख्या डिजिटल पर्यायांचा प्रभावी वापर केला होता. त्या काळात अनेकांनी घरातून काम करण्याच्या पद्धतीशी जुळवून घेतले आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. बदलत्या परिस्थितीत अशा सुविधांना पुन्हा प्राधान्य देण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या शेजारील प्रदेशात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत असून भारतालाही त्याचा परिणाम जाणवत आहे. अशा परिस्थितीत परकीय चलनाची बचत करणे आणि अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. याच कारणामुळे पुढील एक वर्ष नागरिकांनी परदेश प्रवास शक्यतो टाळावा किंवा कमी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
इंधन बचत म्हणजेही देशसेवा !
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, सध्या जागतिक स्तरावर इंधन महाग झाले आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची बचत करणे हे केवळ आर्थिक गरज नसून ते देशाप्रती जबाबदारीही आहे. इंधन बचत हीसुद्धा एक प्रकारची देशभक्ती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
नागरिकांनी शक्य तितका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. बस, रेल्वे आणि मेट्रो यांसारख्या सेवांचा अधिक वापर केल्यास इंधन खर्च कमी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले. याशिवाय, पर्यावरणपूरक आणि कमी खर्चिक पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरालाही प्रोत्साहन देण्यावर त्यांनी भर दिला.
देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगत, बदलत्या जागतिक परिस्थितीत प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे मोदी यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.







