बेंगळुरू (कर्नाटक) – सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ‘इस्रो’च्या ‘आदित्य एल्-१’ यानाने पृथ्वीचे प्रभावक्षेत्र ओलांडून सूर्याच्या दिशेने प्रवास चालू केला आहे. २ सप्टेंबर या दिवशी ‘आदित्य एल्-१’चे पृथ्वीवरून प्रक्षेपण केल्यानंतर अवकाशयानाने त्याच्या प्रवासातील दुसरा मोठा आणि महत्त्वाचा टप्पा पार केल्याची माहिती ‘इस्रो’ने त्याच्या ‘एक्स’वरील खात्याद्वारे दिली आहे.

‘आदित्य एल्-१’ने आतापर्यंत ९.२ लाख किलोमीटर अंतर पार केले आहे. पृथ्वीच्या प्रभावक्षेत्रातून बाहेर पाऊल टाकणारे भारताचे हे दुसरेच अवकाशयान आहे. याआधी केवळ ‘मार्स ऑर्बिटर मिशन’ म्हणजेच मंगळयान यशस्वीपणे पृथ्वीच्या प्रभावक्षेत्राबाहेर गेले होते.

‘पी.एस्.एल.व्ही.’च्या साहाय्याने उड्डाण केल्यानंतर आरंभीचे १६ दिवस ‘आदित्य एल्-१’ पृथ्वीभोवतीच लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये परिभ्रमण करत होते. १९ सप्टेंबर या दिवशी त्याने चौथ्यांदा पृथ्वीची कक्षा पालटली. सूर्य आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने या यानाचा सूर्याच्या दिशेने प्रवास चालू आहे.