‘चॅटजीपीटी’ला प्रत्युत्तर म्हणून गूगलने आणला ‘बार्ड’ !

17

आता ‘गूगल’ आस्थापनानेही त्याचे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (ए.आय.) म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्तेविषयीची संभाषणात्मक संगणकीय प्रणाली ‘बार्ड’ चालू केली आहे. गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी ‘बार्ड’विषयीची माहिती दिली आहे.

पिचाई यांनी सांगितले की, ‘बार्ड’ ही प्रायोगिक संभाषणात्मक ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ सेवा आहे. ‘बार्ड’वरून जी माहिती मिळवू शकाल, ती ‘चॅटजीपीटी’द्वारे शक्य नाही. (चॅटजीपीटी हीसुद्धा एक ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ असणारी संभाषणात्मक संगणकीय प्रणाली आहे). येत्या काही आठवड्यांत लोक ‘बार्ड’ वापरण्यास सक्षम होतील. ‘बार्ड’ सर्जनशीलतेचे केंद्र आणि कुतूहलासाठी ‘लाँचपॅड’ (जेथून एखादी गोष्ट प्रसारित करता येऊ शकते) बनू शकते. आम्ही बार्डची उत्तरे गुणवत्ता, सुरक्षितता आणि वास्तविक-जगातील माहितीच्या सर्वोच्च स्तरावर असावीत, याची निश्चिती करण्यासाठी अभिप्राय एकत्र करू.

चॅटजीपीटी म्हणजे काय ?
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (कृत्रिम बुद्धीमत्ता) म्हणजेच ए.आय. यावर काम करणार्‍या ‘ओपन ए.आय.’ या आस्थापनाने एक नवीन ‘चॅटबॉट’ बनवला आहे. ‘चॅटबॉट’ म्हणजे संगणकाशी गप्पा मारणे. यालाच ‘चॅटजीपीटी’ असे नाव देण्यात आले आहे. चॅटजीपीटी म्हणजे ‘जनेरेटीव्ह प्रीट्रेंड ट्रान्सफॉर्मर’ (Generative Pretrend Transformer) आहे. हे संभाषणात्मक ए.आय. आहे. तुम्ही त्याला काहीही विचारले, तर तो त्या प्रश्नाचे उत्तर माणसांप्रमाणे तपशीलवार लिहून देईल. ते अत्यंत अचूक असेल. हे ३० नोव्हेंबर २०२२ या दिवशी प्रकाशित करण्यात आले आहे. याला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळेच गूगलने ‘बार्ड’ ही ए.आय. प्रणाली आणली आहे. ही प्रणालीही जवळपास अशाच पद्धतीचे कार्य करणार आहे. चॅटजीपीटीमुळे गूगलला स्पर्धा निर्माण झाली होती.