नाशिक: जिल्हास्तरावरील नियुक्ती अधिकाऱ्यांनी अनुकंपा पदभरतीमधील शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने प्रलंबित असलेल्या प्रस्तावांबाबत उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात अनुकंपा पदभरती प्रक्रियेबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह जिल्हा पातळीवरील सर्व विभागांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, अनुकंपा भरती प्रक्रियेत कृषी विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयातील ज्या तांत्रिक पदांची शैक्षणिक पात्रता पूर्ण करणारे अनुकंपा उमेदवार उपलब्ध होत नसतील, अशा विभागांनी संबधित अनुकंपा उमेदवारांना शैक्षणिक पात्रता पूर्ण करण्याबाबत कळविण्यात यावे. तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषद व महामंडळ यांच्या आस्थापनेवरील अनुकंपा पदभरती बाबत संबधित विभागांनी स्वतंत्र बैठक घेण्यात येऊन नियमांनुसार आवश्यक ते नियोजन करण्यात यावे, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील ज्या विभागांची अनुकंपा भरती प्रक्रिया सुरू आहे, त्या विभागांनी येत्या तीन दिवसांत सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात याव्यात. त्या अनुषंगाने नियुक्ती आदेश तयार करून त्यांचे वाटप करण्याचे नियोजन देखील लवकरात लवकर करण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीपूर्वी जिल्ह्यात मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याबाबत सुरू असलेल्या कार्यवाहीचा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आढावा घेतला.
Home Maharashtra अनुकंपा पदभरतीसाठी संबंधित विभागांनी शैक्षणिक पात्रतेबाबत उमेदवारांना मार्गदर्शन करावे – पालकमंत्री दादाजी...