संभाव्य हवामान बदलानुसार खरीप हंगामातील प‍ीक पद्धतीचे नियोजन करावे – पालकमंत्री दादाजी भुसे

5

नाशिक, दिनांक 8 मे, 2023: संभाव्य हवामान बदलानुसार व कमी पावसाच्या अंदाजानुसार खरीप पिक पद्धतीचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2023 नियोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार नितीन पवार, डॉ.राहुल आहेर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, यावर्षी 6.27 लाख हेक्टर क्षेत्र हे खरीप हंगामासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. या क्षेत्रानुसार साधारणत: सोयाबीन वगळता  68 हजार 863 क्विंटल विविध पिकांच्या बियाणे आणि 2 लाख 60 हजार मेट्रीक टन रासायनिक खतांची आवश्‍यकता असल्याने या उपलब्धतेच्या दृष्टीने कृषि विभागामार्फत नियोजन करण्यात यावे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्जाची उपलब्धता झाली पाहिजे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आगामी काळात पाऊस लांबण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार कृषि विभागाने घेण्यात येणाऱ्या पर्यायी खरीप पिक बियाण्यांचे नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. भुसे यांनी दिल्या आहेत.

खरीप हंगामासाठी युरीया खतांच्या साठवणीसाठी प्राधान्य देवून त्यादृष्टीने गोदामांची स्वच्छता करण्याच्या सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना दिल्या. युरिया पुरवठा धारकांनी लिंकींगबाबत कृषी विभागाशी योग्य समन्वय साधावा. तसेच उत्कृष्ठ काम करणाऱ्या विकास सोसायटींमार्फत खतांचा पुरवठा करण्याबाबत देखील पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, शेतीत सेंद्रीय खतांचा वापर वाढून रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने कृषि विभागामार्फत जनजागृतीसह प्रचार, प्रसार व सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव मिळेल यादृष्टीने आर्थिक पाठबळ उपलब्धतेच्या दृष्टीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात यावेत. यासोबत जिल्हाधिकारी, कृषि व इतर शासकीय कार्यालयांच्या आवारात शेतकऱ्यांचा सेंद्रीय पद्धतीने पिकविलेला शेतीमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचा शेतमाल थेट ग्राहकांपर्यंत  पोहचविण्यात नक्कीच मदत होणार आहे. त्यादृष्टीने कृषि विभागाने  शासकीय कार्यालयांच्या आवारातील स्थळे निश्चित करावीत, असेही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.

जागतिक स्तरावर 2023-24 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने तृणधान्य उत्पादन व वापर वाढण्याच्या  आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात. त्यासाठी शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेवून त्यांच्या प्रयोगशील शेतीच्या यशकथा इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेत नवीन बदल केल्यानुसार तालुका स्तरावर प्रस्ताव मंजुरीचे अधिकार तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समितीला देण्यात आले आहेत. तसेच या अपघातामध्ये बाळंतपणातील मृत्यूचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. पिक विमाबाबतच्या नवीन धोरणानुसार 1 रूपया भरून शेतकऱ्याच्या नावे पीकविमा उतरविला जाणार असून इतर हिस्सा रक्कम शासन भरणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री भुसे यांनी यावेळी दिली.

सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणे आवश्यक  : नरहरी झिरवाळ

येणाऱ्या काळात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.  शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून पिकविलेल्या शेतमालास बाजारपेठ उपलब्ध झाल्याच निश्चितच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यास हातभार लागेल, अशी आशा विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी व्यक्त केली. धरणातील गाळ काढण्याच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरीसाठी अधिकाऱ्यांना सूचित करण्याबाबत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बैठकीत सांगितले.

यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी जिल्हास्तरीय खरीप हंगाम 2023 च्या नियोजनाचे सादरीकरण केले. मान्यवरांच्या हस्ते यावेळी जागतिक तृणधान्य वर्ष 2023-24 च्या पोस्टर्स, घडीपत्रिका तसेच तृणधान्य पाककृती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. बैठकीचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन तंत्र अधिकारी विश्वास बर्वे यांनी केले.

या अधिकाऱ्यांचा झाला सत्कार :

कृषि विभागाच्या उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या अधिकारी यांना पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यामार्फत प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. यात तालुका कृषी अधिकारी मालेगाव बाळासाहेब व्यवहारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे तंत्र अधिकारी जयंत गायकवाड, विश्वास बर्वे, लितेश येवळे, तंत्र सहाय्यक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  प्रितम खैरनार, कृषी सहाय्यक शरद वाघ, तंत्र सहाय्यक धनश्री सुर्यवंशी, नांदगाव कृषी पर्यवेक्षक राजेंद्र काळे यांना सन्मानित करण्यात आले.