भारतामध्ये पुन्हा कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या २ जून २०२५ रोजीच्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय कोविड रुग्णांची संख्या ४,३०२ वर पोहोचली आहे. मागील २४ तासांत जवळपास ३०० नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत, तर २ नवीन मृत्यूंसह एकूण मृत्यूंची संख्या ७ वर गेली आहे.
कोविड अपडेट – महत्त्वाची माहिती:
सक्रिय रुग्ण: ४,३०२
नवीन प्रकरणं (जून १): २०३
एकूण मृत्यू (जानेवारी २०२५ पासून): ३२
नवीन मृत्यू (जून १): ५
राज्यनिहाय माहिती:
दिल्ली: ४७ नवीन रुग्ण, एक मृत्यू, एकूण सक्रिय रुग्ण ४८३
केरळ: ३५ नवीन रुग्ण, एकूण सक्रिय रुग्ण १,४३५
महाराष्ट्र: २१ नवीन रुग्ण, एकूण सक्रिय रुग्ण ५०६
पश्चिम बंगाल: ४४ नवीन रुग्ण, एकूण सक्रिय रुग्ण ३३१
केंद्र सरकार सज्ज – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा विश्वास
केंद्रीय आरोग्य आणि आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ३० मे रोजी ANI शी बोलताना सांगितले की, केंद्र सरकार कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. “आपण सर्व राज्यांतील आरोग्य व आयुष सचिवांशी संवाद साधला असून संपूर्ण यंत्रणा सतर्क आहे,” असे त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, मागील कोविड लाटांदरम्यान उभारलेली ऑक्सिजन प्लांट्स, ICU बेड्स यांसारखी यंत्रणा पुन्हा एकदा तपासून सज्ज करण्यात आली आहे.
नव्या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढतेय?
या वर्षी कोविडच्या रुग्णसंख्येत झालेली वाढ LF.7, XFG, JN.1, NB.1.8.1 या चार नवीन व्हेरियंटमुळे झाली आहे. NB.1.8.1 हा नव्याने ओळखलेला उप-प्रकार असून, WHO ने याला ‘Variant Under Monitoring’ घोषित केलं आहे. याचा एक नमुना तामिळनाडूमधून INSACOG या भारताच्या जीनोम सिक्वेन्सिंग समूहाकडे पाठवण्यात आला आहे.
पुन्हा रुग्णसंख्या का वाढतेय?
विशेष म्हणजे, बहुतांश रुग्णांना सौम्य लक्षणं आहेत आणि मृत्यू दर कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, लसीकरणानंतरचा किंवा पूर्वीच्या संसर्गानंतरचा नैसर्गिक संरक्षण कालांतराने कमी होत जातो, ज्यामुळे पुन्हा संसर्गाचा धोका वाढतो. याशिवाय, SARS-CoV-2 विषाणू सातत्याने म्युटेट होत असतो, आणि काही नवीन व्हेरियंट अधिक वेगाने पसरतात किंवा प्रतिकारशक्तीला चुकवू शकतात.