Diwali-lakshmipujan-narakchaturdashi
Diwali-lakshmipujan-narakchaturdashi

आश्‍विन वद्य त्रयोदशी (धनत्रयोदशी), आश्‍विन वद्य चतुर्दशी (नरक चतुर्दशी), अमावास्या (लक्ष्मीपूजन) आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा (बलीप्रतिपदा) असे चार दिवस दिवाळी (Diwali) साजरी केली जाते. काही जण त्रयोदशीला दिवाळीत न धरता, दिवाळी उरलेल्या तीन दिवसांची आहे, असे समजतात. वसुबारस आणि भाऊबीज हे दिवस दिवाळीला जोडून येतात, म्हणून त्यांचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः ते सण वेगवेगळे आहेत.

लक्ष्मीपूजा मुहूर्त 2024 (Lakshmipuja Diwali 2024)

आश्विन अमावास्येच्या, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्व मंदिरांत, दुकानांत, तसेच घराघरांत श्री लक्ष्मीपूजन केले जाते. दिवाळीला दारात आकाशकंदिल लावतात. आकाशकंदिल लावल्यामुळे घराची शुद्धी होते. लहान मुले धर्माभिमान जागृत व्हावा म्हणून किल्ले बांधतात.

लक्ष्मीपूजन (Lakshmipujan) साजरा करण्याची पद्धत

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने देवी लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.

प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे.

लक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. ब्राह्मणांना आणि अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य !

पूजनाची सोप्या भाषेत शास्त्रोक्त माहिती तसेच संपूर्ण पुजाविधी अवश्य वाचा श्री लक्ष्मीकुबेर पूजाविधी

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री केर का काढतात ?

‘मध्यरात्री नवीन केरसुणीने घरातील केर सुपात भरून तो बाहेर टाकावा’, असे सांगितले आहे. याला ‘अलक्ष्मी (कचरा, दारिद्र्य) निःसारण’ म्हणतात. एरव्ही कधीही रात्री घर झाडणे वा केर टाकणे करायचे नसते. फक्त या रात्री ते करायचे असते. कचरा काढतांना सुपे आणि दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला हाकलून लावतात.

गुण निर्माण केले तरीही दोष नाहीसे झाले तरच गुणांना महत्त्व येते. येथे लक्ष्मीप्राप्तीचा उपाय झाला, तसेच अलक्ष्मीचा नाशही झाला पाहिजे; म्हणून या दिवशी नवीन केरसुणी विकत घेतात. तिला ‘लक्ष्मी’ म्हणतात.

लक्ष्मीची पूजा करतांना अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक का काढावे ?

आश्विन अमावास्येच्या दिवशी केल्या जाणार्‍या श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. अक्षतांत सर्व देवतांच्या स्वरूपात्मकतेशी, म्हणजेच स्थितीजन्यात्मक स्थितीस्वरूपतेच्या (तारक स्वरूपाच्या) आणि स्थितीजन्यात्मक चालनात्मकतेच्या (मारक स्वरूपाच्या) लहरी ग्रहण करून त्यांना क्रियामय संचारण करण्यासाठी आसन देऊन प्रत्यक्ष स्वक्रियावलयतेची पूर्णात्मकता प्रदान करण्याची सर्वोच्च क्षमता असते; म्हणून सर्व देवतांची पूजा करतांना त्यांना अक्षतांचे आसन दिले जाते. अन्य देवतांच्या तुलनेत श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व अक्षतांमध्ये ५ टक्के जास्त प्रमाणात आकृष्ट होते; कारण अक्षतांत श्री लक्ष्मीच्या प्रत्यक्ष सगुण गुणात्मक, म्हणजेच संपन्नतेच्या लहरी आकृष्ट करण्याची क्षमता असते. अक्षतांमध्ये तारक आणि मारक लहरी ग्रहण करून त्यांचे संचारण करण्याची क्षमता असल्याने लक्ष्मीची पूजा करतांना अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढावे.

नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi)

नरकासुर राक्षसाच्या वधाप्रित्यर्थ साजरा केला जाणार्‍या दिवाळीतील या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते.

‘श्रीमद्भागवतपुराणात अशी एक कथा आहे – पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला. त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही ‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला.

आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात.

अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस (रक्त) जिभेला लावतात.

दुपारी ब्राह्मणभोजन घालतात आणि वस्त्रदान करतात.

प्रदोषकाळी दीपदान करतात. ज्याने प्रदोषव्रत घेतले असेल, तो प्रदोषपूजा आणि शिवपूजा करतो.

संदर्भ – सनातन संस्था संकेतस्थळ sanatan.org