गुरुपौर्णिमा हा उत्सव आषाढ पौर्णिमा या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी गुरुपौर्णिमा ३ जुलै २०२३ या दिवशी आहे. गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण रूप ! मायेच्या भवसागरातून शिष्याला आणि भक्ताला अलगदपणे बाहेर काढणारे, त्याच्याकडून आवश्यक ती साधना करवून घेणारे आणि कठीण समयी त्याला अत्यंत जवळिकीने अन् निरपेक्ष प्रेमाने आधार देऊन संकटमुक्त करणारे हे गुरुच असतात. वर्षभर प्रत्येक गुरु आपल्या भक्तांना अध्यात्माचे बोधामृत भरभरून देत असतात. अशा गुरूंच्या प्रती अनन्य भावाने कृतज्ञता व्यक्त करणे, हा गुरुपौर्णिमा साजरा करण्यामागील उद्देश आहे.

प्रतिवर्षी अनेक जण एकत्रित येऊन त्यांच्या संप्रदायानुसार गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करतात.

देवाने ह्रदयात सगळे भाव दिले; पण समाधान (आनंद किंवा शांती) केवळ गुरुच देतात. देवाने ते दिले नाही.

– प.पू. भक्तराज महाराज.

गुरु-शिष्य परंपरा’ ही हिंदूंची लक्षावधी वर्षांची चैतन्यमय संस्कृती आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपूजन होते, तसेच गुरु-शिष्य परंपरेची महती समाजाला सांगता येते. थोडक्यात गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु-शिष्य परंपरेचे जतन करण्याची सुसंधीच होय !

गुरुपौर्णिमा या दिवशी गुरु तत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत १ सहस्र पटीने कार्यरत असते. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने केलेली सेवा आणि त्याग (सत्साठी अर्पण) यांचा इतर दिवसांच्या तुलनेत १ सहस्र पटीने लाभ होतो; म्हणून गुरुपौर्णिमा ही गुरु कृपेची (ईश्वर कृपेची) एक अनमोल पर्वणीच आहे.

गुरूंप्रती भाव वाढवण्यासाठी हे करा !

सेवेच्या माध्यमातून साक्षात् गुरूंच्या सेवेत सहभागी होऊन स्वत:चा उद्धार करून घ्या.

भगवंताने ज्या स्थितीत आपल्याला ठेवले आहे, त्या स्थितीत भगवंताला अपेक्षित असे प्रयत्न तळमळीने वाढवा

दिवसभर अधिकाधिक गुरू तत्त्व ग्रहण होण्यासाठी भावपूर्ण प्रार्थना करा.

गुरूंनी आपल्यावर केलेल्या प्रीतीसाठी त्यांच्याप्रती अधिकाधिक कृतज्ञता व्यक्त करा.

सकाळी गुरूंची मानस पूजा करा.

गुरूंनी दिलेला नामजप (अथवा गुरुमंत्राचा जप) अधिकाधिक करा. गुरु नसल्यास गुरुप्राप्तिसाठी कुलदेवतेचा नामजप करा !

गुरुपौर्णिमा महोत्सव
WATCH LIVE

https://www.sanatan.org/mr/gurupurnima

संदर्भ आणि माहिती – Sanatan.org (श्री गुरवे नम 🙂