केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील पहिली स्वदेशी सेमीकंडक्टर चिप यावर्षी तयार होणार असल्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. त्यांनी ही घोषणा हैदराबादमधील केशव मेमोरियल एज्युकेशनल सोसायटीच्या ८५ व्या स्थापना दिन समारंभात केली.
वैष्णव यांनी सांगितले की, “भारताची पहिली सेमीकंडक्टर चिप लवकरच प्रत्यक्षात येणार असून, या दिशेने सरकारने मोठं पाऊल उचललं आहे”. आतापर्यंत सहा सेमीकंडक्टर प्लांट्सना मंजुरी देण्यात आली आहे, आणि त्यांचे बांधकाम सुरू आहे.
ते पुढे म्हणाले की, India AI मोहिमेअंतर्गत मोफत डाटासेट्स आणि संशोधन साधनं उपलब्ध करून दिली जात आहेत, जे विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना मोठी मदत करतील. भारत हे भविष्यात ग्लोबल टेक्नॉलॉजी हब होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“भारतातील दर्जेदार शिक्षण, तंत्रज्ञान आणि संशोधन पाहता, लवकरच विकसनशील देशांतील विद्यार्थी भारतात शिकण्यासाठी येतील,” असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.
ही घोषणा भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरणार असून, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला मोठा चालना देणारी आहे. भारत आता स्वतंत्रपणे सेमीकंडक्टर चिप्स तयार करू शकतो, ही बाब जागतिक बाजारातही भारताला एक नव्या उंचीवर नेणार आहे.







