जगभरातील मुसलमानांकडून ‘हलाल हॉलिडेज’ची वाढती मागणी

7

लंडन (ब्रिटन) – जगभरातील मुसलमानांकडून ‘हलाल हॉलिडेज’च्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा सुट्टयांसाठी मुसलमानांकडून इस्लामी देशांची प्राधान्याने निवड केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘हलाल हॉलिडेज’ म्हणजे इस्लामी श्रद्धा जपत सुट्टयांचा आनंद घेता येऊ शकणारी ठिकाणे

ब्रिटनमधील प्रभावशाली व्यक्तीमत्व असलेल्या झाहरा रोज या मुसलमान महिलेने सांगितले की, त्यांनी आतापर्यंत ३० हून अधिक ‘हलाल हॉलिडेज’ अनुभवले आहेत. त्या म्हणतात, ‘माझ्यासाठी हलाल सुट्ट्या आणि सामान्य सुट्ट्या यांमधील सर्वांत मोठा भेद म्हणजे एकांतपणा. ‘हलाल हॉलिडेज’च्या काळात हलाल अन्नही सहज उपलब्ध होते, असेही झाहरा रोज यांनी सांगितले.

इस्तांबुल (तुर्किये) येथील ३६ वर्षीय हेजर सुजोगलू आदिगुजाई या मुसलमान महिलेने सांगितले की, त्यांना तुर्कियेमध्ये ‘हलाल हॉलिडेज’साठी जागा शोधण्यासाठी कुठलीही अडचण येत नाही; परंतु त्या सहकुटुंब जेव्हा इस्लामेतर देशांमध्ये प्रवास करतात, तेव्हा त्यांना ‘हलाल हॉटेल’साठी फार शोधाशोध करावी लागते. आदिगुजाई या दिवसातून ५ वेळा नमाजपठण करतात. त्या म्हणाल्या, ‘हलाल हॉटेल’मध्ये नमाजसाठी चटई देतात. आमच्या मुलांनी आमचा धर्म आणि संस्कृती यांचे पालन करणार्‍या लोकांसमवेत रहावे, अशी आमची इच्छा आहे. पर्यटन उद्योग अद्याप ‘हलाल हॉलिडेज’ची संकल्पना पूर्णपणे विकसित करू शकलेला नाही, असेही मत आदिगुजाई यांनी व्यक्त केले.

ग्लोबल मुस्लिम ट्रॅव्हल इंडेक्स’नुसार, वर्ष २०२२ मध्ये ‘हलाल ट्रव्हल’ व्यवसाय २२० अब्ज डॉलर एवढा झाला. काही आस्थापने ‘हलाल पर्यटना’त विशेष रूची दाखवतात, तर काही आस्थापने त्याकडे केवळ पर्याय म्हणून बघतात.

मालदीवचे पर्यटनमंत्री डॉ. अब्दुल्ला मौसूम म्हणतात, ‘‘मालदीव हा मुसलमान देश असून आमच्याकडे पूर्वीपासूनच मुसलमानांना अनुकूल असे पर्यटन आहे. हे क्षेत्र फार झपाट्याने वाढत आहे. अनेक ‘रिसॉर्ट’मध्ये खोल्यांचे वितरण, खोल्यांची रचना आणि खाण्याचे पदार्थ यांविषयी मुसलमानांना अनुकूल वातावरण असते.