भारत आता महासागराच्या खोलातही जाण्याचा विचार करत आहे. पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी 3 ऑगस्ट रोजी राज्यसभेत सांगितले की, समुद्रयान Samudrayaan प्रकल्पांतर्गत पाणबुडी एका सबमर्सिबल वाहनात तीन मानवांना 6000 मीटर खोलीपर्यंत घेऊन जाईल.

समुद्रयान मोहीम ही भारताची पहिली मानवयुक्त मोहीम आहे, ज्याअंतर्गत 3 मानवांना समुद्राच्या 6000 मीटर खोलीवर पाठवले जाईल. या मोहिमेत पाण्याखाली पाठवल्या जाणार्‍या सबमर्सिबल वाहनाला मत्स्य-6000 असे नाव देण्यात आले आहे. 2024 मध्ये या वाहनाची चाचणी घेण्यात येईल आणि त्यानंतर 2026 पर्यंत ते महासागराच्या खोलात जाण्यासाठी पूर्णपणे तयार होईल, अशी माहिती मिळत आहे.

या मोहिमेद्वारे समुद्राच्या पृष्ठभागाची माहिती संकलित केली जाणार आहे. यासोबतच समुद्राच्या खोलात आणखी कोणती संसाधने आहेत याचीही खातरजमा केली जाणार आहे. या मोहिमेचा पर्यावरणावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. हे वाहन केवळ समुद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेईल आणि माहिती गोळा करेल.

किरेन रिजिजू यांनी 8 जून 2023 रोजी सांगितले होते की, भारताने 7000 मीटर खोलीवर मानवरहित मोहीम पूर्ण केली आहे. पहिल्यांदाच समुद्रयान मोहिमेत ३ मानव पाठवण्याची तयारी सुरू आहे. हे मिशन केंद्राच्या ब्लू इकॉनॉमिक पॉलिसीला पाठिंबा देईल असे सांगण्यात येत आहे.