कुचराई नकोच…

100

देशात कोरोना महामारीचा काही ठिकाणी दुसरा, काही ठिकाणी तिसरा, तर काही ठिकाणी चौथा टप्पा चालू झाला आहे. औषध नसल्याने ‘स्वतःला वाचवणे’ हाच उपाय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ नोव्हेंबर या दिवशी पुन्हा एकदा देशाला संबोधित करतांना सांगितले आणि जनतेला काळजी घेण्याचे कळकळीचे आवाहन केले.

२८ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदी पुणे येथील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये येऊन लस बनवण्याचा आढावा स्वतः जातीने घेणार आहेत; परंतु लस येणार आणि त्यानंतर ती जनतेत वितरित होणार यात पुष्कळ मोठा कालावधी असणार आहे. लस साठवण्यासाठी जागा आणि लसीचे वितरण होण्यासाठी योग्य ती कार्यपद्धत राज्यांनी बारकाईने बसवणे, हे राज्यांचे दायित्व रहाणार आहे; त्यात चुका, गोंधळ, भ्रष्टाचार आदी गोष्टी झाल्या, तर आपल्यासारखे वाईट आपणच असणार आहोत. लस मिळूनही ती जनतेपर्यंत व्यवस्थित पोचली नाही, तर ‘देव देतो आणि कर्म नेते’ असे होईल. हे टाळण्यासाठीच्या योजना आतापासून करण्याची सिद्धता राज्यांनी गांभीर्याने करायला हवी.

सध्या मात्र लस येईपर्यंत घ्यावयाच्या कोरोनाप्रतिबंधक काळजीत जराही कुचराई होता कामा नये, असे जनतेने पाहिले पाहिजे. नागरिक मास्क लावणे, हे दंड लावूनही गांभीर्याने घेत नाहीत. सामाजिक अंतराचा सर्वत्र फज्जा उडालेला आहे. मुंबईचे आयुक्त इक्बाल चहल यांनी फटाके न उडवल्याविषयी नागरिकांचे कौतुक केले आहे; पण तेवढे पुरेसे नाही. नागरिकांनी स्वतःचे आणि समाजाचे दायित्व घेऊन कोरोनाच्या संदर्भातील काळजीत कोणतीही कुचराई न करणे, हे त्यांचे एकप्रकारे राष्ट्रप्रेमच राहील !

संदर्भ व अधिक माहिती – सदर लेख दैनिक सनातन प्रभात मधून घेतलेला आहे.