मुंबई – ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘हरित हायड्रोजन’ धोरण घोषित केले आहे. ४ जुलै या दिवशी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली असून त्यासाठी ८ सहस्र ५६२ कोटी रुपये इतका निधी संमत करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
राज्यशासनाने घोषित केलेल्या या प्रकल्पाद्वारे वीज वितरण आस्थापन, तसेच हरित हायड्रोजन उर्जेचा उपयोग करणार्या प्रकल्पांना विविध सवलती दिल्या जाणार आहेत.
हरित हायड्रोजनच्या निर्मितीचे प्रकल्प कार्यान्वित करणार्या आस्थापनांना १० वर्षांसाठी पारेषण शुल्कामध्ये ५० टक्के, तर ‘व्हिलिंग चार्जेस’मध्ये ६० टक्के इतकी सवलत देण्यात येणार आहे. पाच वर्षांसाठी हरित हायड्रोजनच्या गॅसमध्ये मिश्रणासाठी प्रत्येक किलोकरता ५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे, तसेच पहिल्या २० प्रकल्पांना ४ कोटी ५० लाख रुपये मर्यादेत ३० टक्के भांडवली व्ययावर अनुदान देण्यात येईल. पहिल्या ५०० हरित हायड्रोजन आधारित फ्युएल सेल प्रवासी वाहनांना कमाल ६० लाख रुपये इतक्या मर्यादेत ३० टक्के भांडवली व्यय अनुदान देण्यात येईल. या प्रकल्पासाठी भूमी देणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध करांमध्ये सवलत देण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०२३ पर्यंत भारतात प्रतिवर्षी ५ मिलीयन टन हरित हायड्रोजनची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्राची सध्याची हायड्रोजनची मागणी ०.५२ मिलीयन टन इतकी आहे. वर्ष २०३० मध्ये ही मागणी १.५ मिलीयन टनपर्यंत पोचू शकते.
हरित हायड्रोजन हा ऊर्जेचा एक स्रोत आहे. पाण्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळे करून हरित हायड्रोजन सिद्ध केले जाते. यासाठी ‘इलेक्ट्रोलायझर’चा उपयोग केला जातो. इलेक्ट्रोलायझर अक्षय ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी) वापरते. यामध्ये सौर आणि पवन ऊर्जा (सोलार आणि विंड) या दोन्हींचा समावेश आहे. हायड्रोजनचा उपयोग रसायने (केमिकल), लोह, पोलाद, वाहतूक, हीटिंग आणि वीज यांच्या निर्मितीच्या क्षेत्रात केला जातो. हरित हायड्रोजनमुळे प्रदूषण होत नाही.
हरित हायड्रोजनवर चालणार्या वाहनांमध्ये हायड्रोजनच्या दोन टाक्या असतात. यांतील एकामध्ये ‘हायली कंप्रेस्ड’ आणि दुसर्यामध्ये ‘ लो कम्प्रेस्ड’ असतो. हायड्रोजन वायू अत्यंत ज्वलनशील आहे. त्यामुळे त्याची टाकी आणि तो वाहून नेणारा पाईप मजबूत असणे आवश्यक आहे. या तंत्रज्ञानामध्ये एका टाकीत एका बाजूने ऑक्सिजन आणि दुसर्या बाजूने हायड्रोजन पाठवला जातो. दोघांमधील रासायनिक अभिक्रियामुळे एक ऊर्जा निर्माण होते. ज्यामुळे गाडी धावते. यातून धुराऐवजी पाणी बाहेर पडते
Image by <a href=”https://pixabay.com/users/akitada31-172067/?utm_source=link-attribution&utm_medium=referral&utm_campaign=image&utm_content=6212536″>Roman</a> from <a href=”https://pixabay.com//?utm_source=link-attribution&utm_medium=referral&utm_campaign=image&utm_content=6212536″>Pixabay</a>