देशातील अनेक शहरांमध्ये तापमान ५० अंशांवर पोहोचले होते. वाढत्या उकाड्यामुळे त्रस्त नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मोसमी वारे, म्हणजेच मान्सून, ३० मे रोजी केरळच्या किनारपट्टीवर दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनाने नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. हवामान विभागाने (IMD) अंदाज वर्तवला आहे की महाराष्ट्रात मान्सून १० ते ११ जून दरम्यान दाखल होईल. प्राथमिक अंदाजानुसार, मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता होती. पण, वेगाने पुढे सरकत असल्याने आजच तो केरळमध्ये दाखल झाला आहे.
IMD च्या मते, मान्सूनच्या आगमनानंतर देशभरात ३१ मे पासून उष्णतेची लाट कमी होण्यास सुरुवात होईल. येत्या काही दिवसांत अरबी समुद्रातून वारे वाहू लागल्याने तापमानातही घट होण्याची अपेक्षा आहे. मान्सून महाराष्ट्राआधी ६ किंवा ७ जून रोजी कर्नाटकात दाखल होईल. हवामान विभागाच्या पुढील अंदाजानुसार, राज्यात १० ते ११ जून दरम्यान पावसाची हजेरी लागेल. उत्तर भारतातही उष्णतेपासून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
IMD ने बुधवारी अंदाज वर्तवला होता की मान्सून केरळकडे सरकत आहे. IMD ने उष्णतेचा सामना करणाऱ्या उत्तर आणि मध्य भारतातील राज्यांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. आजपासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात होईल. पुढील आठवड्यात ईशान्येकडील राज्यांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. बंगाल, झारखंड, बिहार आणि ओडिशामध्ये ३१ मे ते २ जून दरम्यान पाऊस आणि वादळे येण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरमध्येही हवामान बदलण्याची शक्यता आहे.