Home Crime महाराष्ट्रात दिवसाला १०५ महिला गायब होतात, तर वर्षभरात राज्यातील ४ सहस्र ५६२...

महाराष्ट्रात दिवसाला १०५ महिला गायब होतात, तर वर्षभरात राज्यातील ४ सहस्र ५६२ मुले गायब

71

मुंबई – ‘राष्ट्रीय क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या अहवालानुसार महाराष्ट्रातून दिवसाला १०५ महिला गायब होतात. प्रत्येक आठवड्यात १७ महिलांची तस्करी होते. मागील वर्षभरात महाराष्ट्रातील ४ सहस्र ५६२ मुले गायब झाली आहेत. त्यामध्ये महिलांचे प्रमाण ५५ टक्के आहे. या महिलांचे शारीरिक शोषण केले जाते. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातून महिला गायब होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

महिला आणि मुले यांच्या तस्करी होण्याच्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेश आणि बंगाल या राज्यांचा क्रमांक लागतो. सद्य:स्थितीत महाराष्ट्रात तस्करीचे ९८९ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये महिलांची तस्करी झाल्याचे ८८ टक्के, तर लहान मुलांच्या तस्करीचे प्रमाण ६ टक्के आहे. कष्टाच्या कामासाठी राबवणे, शरिरातील अवयव काढून विकणे, अमली पदार्थांची तस्करी करणे, शारिरीक शोषण, बलपूर्वक विवाह आदींसाठी महिला आणि लहान मुले यांची तस्कारी होते. महाराष्ट्रामध्ये गायब होत असलेल्या महिलांपैकी ९५.६ टक्के महिलांना बलपूर्वक वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जाते, असे अन्वेषणात आढळून आले आहे.

मुलांच्या तस्करीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

धक्कादायक गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात मुलांच्या तस्करीचे प्रमाण न्यून व्हायच्या ऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. मुलांच्या तस्करीमध्ये वर्ष २०१८ पेक्षा वर्ष २०१९ मध्ये १८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्ष २०१८ मध्ये मुलांच्या तस्करीच्या आकडेवारीमध्ये भारतातील सर्वाधिक १० राज्यांच्या सूचीत महाराष्ट्राचे नाव नव्हते; मात्र सद्य:स्थितीत लहान मुलांच्या तस्करीमध्ये महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. इतकी भयंकर स्थिती असतांना याकडे अद्यापही गांभीर्याने पाहिले जात नाही. महाराष्ट्रातील अपहरणाच्या घटनांमध्येही वाढ होत असून वर्ष २०१९ पेक्षा चालू वर्षात हे प्रमाण १.३ टक्क्यांनी वाढले आहे.

वेश्या व्यवसाय चालणार्‍या क्षेत्रात महिलांना पाठवले जात असल्याची शक्यता

मुंबई, पुणे आणि नागपूर या महाराष्ट्रातील शहरांमध्ये वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. राज्यातील अन्य भागांमध्येही वेश्या व्यवसाय चालू होत आहे. तस्करी करण्यात आलेल्या महिलांना या ठिकाणी वेश्या व्यवसाय करण्यासाठी पाठवले जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Source – sanatanprabhat.org