के.के.वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब देवराम वाघ (भाऊ) यांचे दि ६/२/२०२२ रोजी रात्री १०.३० मि. वयाच्या ९० व्या वर्षी दु:खद निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांना लहानपणापासून कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ.पंजाबराव देशमुख, कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, क्रांतिसिंह नाना पाटील, कुसुमाग्रज व आजोबा सयाजीबाबा वाघ अशा थोर व्यक्तींचा सहवास लाभला.

भाऊ आजवर अतिशय निरोगी आणि समृद्ध आयुष्य जगले. भाऊ महाराष्ट्र राज्य खाजगी विनाअनुदानित अभियांत्रिकी, विनाअनुदानित तंत्रनिकेतन आणि विनाअनुदानित कृषी व कृषी संलग्न महाविद्यालये या तिन्ही राज्यसंघटनेचे स्थापनेपासून ते आजपर्यंत १६ वर्षे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

भाऊ यांचे नाव के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले गेले आहे. त्यांचे स्थान प्रत्येकाच्या हृदयात राहील.

कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या प्रेरणेने त्यांनी के.के.वाघ शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी संस्थेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष पदावरन खंबीरपणे धुरा सांभाळली. के के वाघ संस्थेच्या रोपट्याचे त्यांनी महाकाय वटवृक्षात रुपांतर केले. त्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.