आज रथसप्तमी त्यानिमित्ताने..

25

हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृती यांमध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण अन् उत्सव आहेत. त्याचप्रमाणे त्यांत कनिष्ठ देवतांचीही उपासना आहे. सूर्य, चंद्र, अग्नि, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात, तसेच सर्वच प्राणिमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय संस्कृती सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्यदेवतेप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘रथसप्तमी’ हा सण साजरा केला जातो.

माघ मासातील (महिन्यातील) शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो. या रथाला सात घोडे असतात; म्हणून ‘रथसप्तमी’ असा शब्द वापरला जातो. ज्या सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवे जीवन लाभते, त्या भास्कराची ही पूजा आहे. ही प्रकाशाची, सूर्यदेवतेची पूजा आहे. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेल्या हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो.

रथसप्तमी तिथीचे महत्त्व

‘माघ शुक्ल पक्ष सप्तमी’ या दिवशी श्वसुर विश्वकर्म्याने जावयाला, म्हणजे सूर्याला अश्वासहित दिव्य रथ दिला. त्यामुळे सूर्याच्या कार्याचा शुभारंभ झाला. म्हणून ही तिथी ‘रथसप्तमी’ या नावाने ओळखली जाते. सर्व संख्यांमध्ये ‘सात’ या अंकाचे महत्त्व विशेष आहे. ‘सात’ या आकड्यात त्रिगुणांचे समतोल प्रमाण असण्याबरोबर सत्त्वगुणाच्या वृद्धीसाठी आवश्यक चैतन्य, आनंद इत्यादि सूक्ष्म-लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते. सप्तमी या तिथीला शक्ति अन् चैतन्य यांचा सुरेख संगम झालेला असतो. या दिवशी विशिष्ट देवतेचे तत्त्व आणि शक्ती, आनंद आणि शांती यांच्या लहरी २० टक्के जास्त प्रमाणात कार्यरत असतात. रथसप्तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या (अतीसूक्ष्म सूर्यतत्त्वाच्या) लहरी इतर दिवसांच्या तुलनेत ३० टक्के जास्त प्रमाणात कार्यरत असतात.

संदर्भ – सनातन संस्थेचे संकेतस्थळ www.sanatan.org