पुणे – निर्भया प्रकरणानंतर केंद्र पातळीवर एकच ‘हेल्पलाईन’ असावी, असा सूर सर्व स्तरांतून उमटला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आपत्कालीन प्रतिसाद साहाय्य प्रणाली (ई.आर्.एस्.एस्.) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशासह देशातील २० राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही पोलिसांशी संपर्क साधण्याचा ‘१००’ हा क्रमांक आता पालटला जाणार असून, ‘११२’ या एकाच ‘हेल्पलाईन’वरून सर्व प्रकारचे साहाय्य मिळणार आहे. पोलीस, अग्नीशमन दल आणि महिला ‘हेल्पलाईन’चे एकत्रित साहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी देशपातळीवर हा निर्णय घेतला जात आहे.
आतापर्यंत देशातील २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांनी एकच आपत्कालीन ‘हेल्पलाईन’ क्रमांक ‘११२’ स्वीकारला आहे. विशिष्ट यंत्रणेच्या साहाय्याने एका ठिकाणी ‘फोन’ लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा ‘फोन’ कुठून आला आहे ?, हे संबंधितांना समजणार आहे. त्यानंतर तेथील पोलीस नियंत्रण कक्ष, अग्नीशमन दल आणि महिला ‘हेल्पलाईन’, ‘चाइल्ड हेल्पलाईन’ यांना एकाच वेळेस या ‘कॉल’ची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी येणार आहेत.
३१ डिसेंबरपर्यंत राज्यात ‘११२’ ही ‘हेल्पलाईन’ चालू व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. ‘सेंट्रलाइज कंट्रोल रूम’मध्ये एका वेळेस किमान ७० ते ८० टक्के लोक काम करणार. त्यामुळे नागरिकांना अल्प वेळात सर्व प्रकारचे साहाय्य पोचवले जाईल. ‘११२’ चालू झाल्यावर पुढील काही दिवसांसाठी १०० क्रमांकही चालू ठेवण्यात येणार आहे, असे अपर पोलीस महासंचालक तथा ‘सेंट्रलाइज हेल्पलाइन सिस्टिम’चे नोडल ऑफिसर एस्. जगन्नाथन् यांनी सांगितले.
Source – sanatanprabhat.org