फटाके मुक्तीच्या दिशेने…

127

महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळात ठेवण्याचा विचार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच सांगितले. हा विचार अतिशय स्तुत्य असल्याने त्याचे स्वागत आहे. वायू आणि ध्वनी यांचे प्रदूषण करून शरिराची अतिशय हानी करणारे फटाके उडवणे कधीच योग्य नव्हते. भारतात फटाक्यांची रसायने प्राचीन काळापासून माहिती होती. त्याचा वापर हत्तींच्या झुंजींत किंवा शिकारीच्या वेळी अशा अन्य हेतूंसाठी होत असे; पण दीपावलीचा सण साजरा करण्यासाठी नव्हे. ऋग्वेदात ‘दीपावली कशी साजरी करायची ?’ याचा, तर कौटिल्याच्या अर्थशास्त्रात फटाक्यांचा उल्लेख आहे; पण दीपावली साजरी करण्यासाठी त्याचा वापर करण्याचा उल्लेख नाही.

दीपावली हा सण सात्त्विक तुपाच्या दीपज्योतींनी साजरा होत असल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात आहे. पाश्‍चात्त्यांच्या अनेक प्रथा आपण अद्यापही गौरवाने साजर्‍या करत असतो, त्यातीलच फटाके उडवणे एक आहे. ब्रिटनची राणी भारतात आली की, आनंद म्हणून फटाके उडवले जात आणि ती प्रथा आपण मोठ्या प्रमाणात चालू केली; ती इतक्या मोठ्या प्रमाणात आपण अंगीकारली की, तिच्या विविध दुष्परिणामांनी आता कहर केला.

प्रदूषणाच्या निमित्ताने का होईना, ‘आदर्श राष्ट्रासाठी काळ कसा पूरक येत आहे’, याचे हे एक उदाहरण आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून दिवाळीत फटाके उडवण्याचे प्रमाणही अल्प होत आहे. देहली येथे यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने फटाकेविक्रीवर बंदी घातली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने दिवाळीच्या संदर्भात काढलेल्या सूचनांमध्येही फटाके न उडवण्याचे आवाहन केले आहेच. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर हा प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे ठेवावा आणि संमत करून घ्यावा, अशी अपेक्षा आहे

संदर्भ – दैनिक सनातन प्रभात