नक्षलवाद वैचारिक नव्हे, तर देशविरोधी लढाई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

7

– दामरंचा उपपोलीस स्थानकाच्या इमारतीचे उद्घाटन
– गॅरापत्ती पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन
– थेट जनतेत जाऊन वैयक्तिक संवाद
– सी-६० जवांनाचा गणवेश घालून पोलिसांशी संवाद, सत्कार
– हवाईपट्टी, मेडिकल कॉलेजच्या जागेची पाहणी
– शहीद स्थळ स्मारकाला अभिवादन
गडचिरोली, १ मे :- आज महाराष्ट्र दिनी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. ज्या ठिकाणी काल तीन नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले, त्या नजिक असलेल्या दामरंचा आणि दुसरीकडे थेट छत्तीसगडच्या सीमेवर जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधला. सी-६० जवानांचा गणवेश परिधान करुन एकप्रकारे मीही तुमच्यापैकीच एक आहे आणि तुमच्यासोबत आहे, असा संदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिला आणि त्यांचा उत्साह वाढविला. त्यांचा सत्कारही केला.

दुपारच्या सुमारास त्यांचे गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाले. प्रारंभी दामरंचा आणि नंतर ग्यारापत्ती या दोन्ही ठिकाणी त्यांनी पोलीस इमारतींचे उद्घाटन केले. दामरंचा हा गडचिरोलीचा अहेरी तालुक्यातील दक्षिणी भाग, तर ग्यारापत्ती उत्तर गडचिरोलीतील, थेट छत्तीसगडच्या सीमेवर. काल ३ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले, ते ठिकाण दामरंचा येथून ७-८ कि.मी. अंतरावर. आज त्याच भागात देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला. आपले जवान धोका पत्करुन काम करतात. त्यांचे मनोबल वाढविणे आणि नागरिकांशी संवाद साधणे, हाच त्यामागचा दुहेरी उद्देश. ग्यारापत्ती हे महाराष्ट्रातील शेवटचे गाव, तेथूनच छत्तीसगड सुरु होते. पण, पुढे ३५ कि.मी.पर्यंत कोणतेही पोलीस स्थानक नाही.

अतिसंवेदनशील भागात साधारणत: आमदारांच्या पलिकडे कुणी भेटत नाही, तेथे खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी वैयक्तिक संवाद साधला. एसटीचा अर्ध्या तिकिटात प्रवास, शेतीच्या कोणकोणत्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचतात, असे प्रश्न त्यांनी महिला, पुरुषांकडून विचारले आणि शासकीय योजनांबाबत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. काही महिलांनी सध्या केवळ सकाळी आणि सायंकाळीच बस येते, दुपारी बस सुरु करा, अशी मागणी केली. त्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचवेळी महिलांना अर्धे तिकिट आणि लेक लाडकी या योजनांचे महिलांनी स्वागत सुद्धा केले. आदिवासी बांधवांनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

नक्षलवाद ही देशविरोधी लढाई…!


नक्षलवाद ही विचारांची नाही, तर आता देशविरोधी लढाई आहे. इतर परकीय शक्ती आणि आयएसआयसारख्यांची मदत या नक्षलवाद्यांना आहे. लोकशाही आणि संविधान न मानणाऱ्यांची ती लढाई आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले.