News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

हिवाळ्यातील थंडीमुळे त्वचेवरील छिद्रे बंद होत असल्याने शरिरातील अग्नी आतल्या आत कोंडला जाऊन जठराग्नी प्रदीप्त होतो. शरिरातील रोगप्रतिकारक क्षमता आणि बळ अग्नीवर अवलंबून असल्याने तीसुद्धा या ऋतूत चांगली असतात; म्हणून हिवाळ्याचे अनुमाने ४ मास (महिने) निसर्गतःच आरोग्य उत्तम रहाते.

२. ऋतूनुसार आहार

२ अ. हिवाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये ? : या ऋतूमध्ये जठराग्नी उत्तम असल्याने कोणत्याही प्रकारचे अन्न सहज पचते. यामुळे या ऋतूमध्ये खाण्यापिण्याला फार मोठे बंधन नसते. ‘या काळात रात्री मोठ्या असल्याने सकाळी उठल्या उठल्या भूक लागते, म्हणून सकाळी आन्हिके आटोपल्यावर पोटभर जेवून घ्यावे’, असे आयुर्वेदात सांगितले आहे. हिवाळ्यात कोरडेपणा वाढलेला असतो. त्यामुळे आहारामध्ये स्निग्ध (तेलकट) घटक उदा. तीळ, शेंगदाणे, खोबरे आवर्जून असावेत; म्हणूनच या दिवसांत तीळगूळ वाटण्याची परंपरा आहे. या ऋतूत आपल्याला पचतील असे पौष्टिक पदार्थ खाऊन तब्येत चांगली सुधारून घ्यावी. अधेमधे खात रहाणे आरोग्याला हानीकारक असते; म्हणून दिवसाच्या ठरवलेल्या २ वेळांमध्ये योग्य मात्रेत जेवावे, म्हणजे अवेळी भूक लागत नाही. पचन चांगले होण्यासाठी जेवणानंतर विडा खावा.

२ आ. कूलरमधील थंड पाणी आरोग्याला अपायकारक : कोणत्याही ऋतूमध्ये शीतकपाटातील किंवा कूलरमधील थंड पाणी पिणे आरोग्याला अपायकारक आहे. असे पाणी प्यायल्याने पचनशक्ती मंद होते आणि सर्दी, खोकला, सांधेदुखी, आळस यांसारखे विकार उद्भवतात.

३. हिवाळ्यातील इतर आचार

३ अ. ब्राह्ममुहूर्तावर उठणे : या दिवसांत ‘थंडीमुळे आणखी थोडेसे झोपावे’, असे वाटत असले, तरी नियमितपणे ब्राह्ममुहूर्तावर, म्हणजे सूर्योदयाच्या दीड घंटा अगोदर उठावे. नियमितपणे ब्राह्ममुहूर्तावर उठणे ही एक कृतीही सर्व रोगांपासून दूर ठेवणारी आहे.

३ आ. औषधी धूमपान करणे : सकाळी दात घासल्यावर औषधी धूर घ्यावा. असे केल्याने सर्दी, खोकला यांसारख्या कफाच्या विकारांना आळा बसतो. कागदाच्या सुरळीमध्ये ओव्याची पूड घालून विडी बनवावी आणि ती एकीकडून पेटवून दुसरीकडून धुराचे ३ झुरके घ्यावेत. धूरयुक्त श्‍वास नाकाने न सोडता तोंडानेच सोडावा. ओव्याऐवजी तुळशीच्या पानांची भुकटीही वापरता येते.

३ इ. अंघोळीपूर्वी अंगाला नियमित तेल लावणे : या ऋतूत अंघोळीपूर्वी नियमितपणे अंगाला खोबरेल तेल, तीळ तेल, सरकीचे तेल, शेंगदाणा तेल, मोहरीचे तेल यांपैकी कोणतेही तेल लावावे. यामुळे थंडीमुळे त्वचा कोरडी होऊन खाज येणे; त्वचा, ओठ, पाय यांवर भेगा पडणे हे विकार होत नाहीत. खोबरेल तेल थंड, तर मोहरीचे तेल उष्ण असते. असे असले, तरी हिवाळ्यात खोबरेल तेल वापरले, म्हणून अपाय होत नाही. नेहमी उष्णतेचे विकार होणार्‍यांना खोबरेल तेल फारच लाभदायक ठरते. पेट्रोलियम जेली, कोल्ड क्रीम यांसारखी महागडी आणि कृत्रिम प्रसाधने वापरण्यापेक्षा त्यांहून स्वस्त आणि नैसर्गिक तेल वापरणे त्वचेच्या आरोग्यासाठी जास्त उपयुक्त आहे.

३ ई. व्यायाम : हिवाळ्यामध्ये भरपूर व्यायाम आणि श्रम करावेत. सकाळी अंगाला तेल लावून व्यायाम करावा आणि त्यानंतर अर्ध्या घंट्याने अंघोळ करावी.

३ उ. स्नान : या ऋतूत गरम पाण्याने स्नान करावे.

३ ऊ. कपडे : थंडीपासून रक्षण होण्यासाठी ऊबदार कपडे वापरावेत.

४. हे कटाक्षाने टाळा !

दवात किंवा चांदण्यात फिरणे, थंडीपासून स्वतःचे संरक्षण न करणे, पाण्याचे तुषार अंगावर घेणे, सतत पंख्याचा जोराचा वारा अंगावर घेणे, दिवसा झोपणे या गोष्टी या ऋतूत कटाक्षाने टाळाव्यात. या गोष्टींमुळे शरिरातील कफ वाढतो आणि विकार निर्माण होतात.

‘हिवाळ्यासंबंधीच्या ऋतूचर्येचे पालन करून साधक निरोगी होवोत आणि सर्वांचीच आयुर्वेदावरील श्रद्धा वाढो’, ही भगवान धन्वन्तरीच्या चरणी प्रार्थना !’

संदर्भ – दैनिक सनातन प्रभात( वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.) (२१.१.२०१५)