News Update thalaknews.com
News Update thalaknews.com

भागवत धर्माचा समाजप्रबोधनाचा समृद्ध वारसा नव्या पिढीसमोर नेण्याच्या उद्देशाने ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील वारकरी मंडळांच्या विद्यमाने श्री मलंगगडाच्या पायथ्याशी कोकण प्रांतातील सर्वांत मोठ्या राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २ ते ९ जानेवारी या कालावधीत श्री मलंगगडाच्या पायथ्याशी असणार्‍या उसाटणे या गावात हा सोहळा होणार आहे.

कोकण प्रांतात पहिल्यांदाच होणार्‍या या भव्य कीर्तन सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित रहाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. तसेच सोहळ्यासाठी लागणारे आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कीर्तन सोहळ्याच्या सिद्धतेचा नुकताच आढावा घेत ‘हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित सहकार्य करावे’, असे आवाहन केले आहे.

या कीर्तन सोहळ्याच्या निमित्ताने उद्घाटनाच्या दिवशी २ जानेवारीला सकाळी ८ वाजता श्री मलंगगडाच्या पायथ्यापासून ते कार्यक्रमस्थळापर्यंत भव्य अशी दिंडी काढली जाणार आहे. यात अनेक ढोल-ताशा वादक, लेझीम पथक, शेकडो वारकरी, अनेक कीर्तनकार यांच्यासह डोक्यावर कलश आणि तुळस घेतलेल्या तब्बल ११ सहस्र महिला वारकरी सहभागी होणार आहेत. ‘भव्य रिंगण सोहळा’ हे या दिंडीचे मुख्य आकर्षण असेल. पंढरपूरच्या वारीप्रमाणे येथेही रिंगण सोहळा होणार असून त्यामध्ये पंढरपूर वारीतील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व आणण्यात येणार असल्याची माहिती ह.भ.प. विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी दिली. कीर्तनासमवेतच ज्ञानेश्वरी पारायणात ५ सहस्र तरुण सहभागी होणार असून ८ जानेवारीला सहस्रावधी दिव्यांच्या माध्यमातून दीपोत्सवही केला जाणार आहे.

या कीर्तन सोहळ्यातून पुढे जाण्याची दिशा मिळेल ! – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

कोणताही पक्ष, संस्था नव्हे, तर सर्व मिळून हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल यासाठी प्रयत्न करत आहोत. मोठ्या प्रमाणात वारकरी मंडळ आणि प्रतिदिन २५ सहस्र नागरिक या सप्ताहाला उपस्थित रहाणार आहेत. या कीर्तन सोहळ्यातून सर्वांना नक्कीच पुढे जाण्याची दिशा मिळेल.