भारत आता अंतराळात स्वतःचे ‘स्पेस स्टेशन’ म्हणजे अंतराळ स्थानक उभारणार आहे. ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक’ आणि चीनचे ‘तियांगाँग अंतराळ स्थानक’ यानंतर जगातील तिसरे अंतराळ स्थानक भारत उभारणार आहे. ‘गगनयान’ मोहिमेनंतर भारत या अंतराळ स्थानक उभारण्यावर काम चालू करणार आहे. गगनयान मोहिमेच्या अंतर्गत भारत चंद्रावर मनुष्य पाठवणार आहे.

भारताकडून बांधल्या जाणार्‍या अंतराळ स्थानकचे वजन २० टन असेल, तर ‘आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानका’चे वजन सुमारे ४५० टन आणि चिनी अंतराळ स्थानकाचे वजन सुमारे ८० टन आहे. भारताच्या अंतराळ स्थानकामध्ये ४-५ अंतराळविरांना सामावून घेता येईल, अशा पद्धतीने ते बनवण्यात येणार आहे. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत ते स्थापित केले जाईल. त्याला ‘लोअर अर्थ ऑर्बिट’ म्हणतात जे सुमारे ४०० किलोमीटर दूर आहे.

भारताच्या अंतराळ स्थानकाची घोषणा वर्ष २०१९ मध्ये इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी केली होती. ‘गगनयान मोहिमेनंतर भारत वर्ष २०३० पर्यंत हे स्वप्न पूर्ण करील’, असेही सांगण्यात आले.

भारताचे अंतराळ स्थानक उभारण्यापूर्वीच अमेरिका भारतीय अंतराळविरांना प्रशिक्षण देईल. यासाठी ‘नासा’ आणि ‘इस्रो’ यांच्यात करारही झाला आहे. वर्ष २०२४ मध्ये भारतातील २ अंतराळवीरही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाऊ शकतात. याआधी त्यांना अमेरिकेतील ह्यूस्टन येथील ‘जॉन्सन स्पेस सेंटर’मध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Image by Steve Bidmead from Pixabay