आज 28 मे 2023. क्रांतिसूर्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांची दिनांकानुसार जयंती त्या निमित्ताने…

लंडनमध्ये स्वा. सावरकरांना अटक होणे, स्वा. सावरकरांनी ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांच्या बोटीतून फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ उडी घेणे आणि त्यानंतर फ्रान्समध्ये ब्रिटीश पोलिसांनी त्यांना पुन्हा पकडणे, या सर्व घटनांनी संपूर्ण युरोपला हादरून टाकले. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ८.७.१९१० या दिवशी मोरिया बोटीतून समुद्रात धाडसी उडी मारली आणि ब्रिटीश सत्तेविरुद्धच्या संघर्षांची लाट जगाच्या कानाकोपर्‍यात पोचली. जिवाची पर्वा न करता भर समुद्रात मारलेली ही उडी त्रिकालखंडात तर गाजलीच, त्याशिवाय त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याची रणदुदुुंभी जगामध्ये निनादली !

पळपुटेपणा नव्हे, तर विचारपूर्वक केलेले मोठे धाडस !
या धाडसामागे स्वा. सावरकरांनी बोटीतून मार्सेलिसच्या समुद्रात उडी घेऊन पोहत जाऊन फ्रान्सचा किनारा गाठला, तो आंतरराष्ट्रीय कायद्याचा लाभ घेऊन ब्र्रिटिशांच्या कैदेतून सुटका करून घेण्यासाठी. याद्वारे त्यांना भारतभूमीच्या सुटकेसाठी मोकळे राहून अन्य देशांत अखंडपणे कारवाया करायच्या होत्या. ब्रिटिशांच्या कैदेत अडकून राहिल्यास स्वातंत्र्यलढ्यात खंड पडेल आणि देशाचे स्वातंत्र्य लांबणीवर जाईल, याच विवंचनेतून त्यांची ती ‘समुद्रझेप’ होती. तो पळपुटेपणा नव्हता; तर तो एक डावपेच होता. ते एक मोठे धाडस होते !

– एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.



उडीपूर्वी झालेल्या अटकेची पार्श्वभूमी !
बॅरिस्टर होण्यासाठी सावरकर लंडनला गेले होते. तेथे ‘फ्री इंडिया सोसायटी’ची स्थापना करून त्याद्वारे त्यांनी भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी घेतलेल्या शपथेला अनुसरून स्वत:चे कार्य चालू ठेवले. जोसेफ मॅझेनीचे चरित्र लिहून ते भारतात पाठवले. त्यातून अनेक क्रांतीकारकांनी स्फूर्ती घेतली. ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ भारतीय क्रांतीकारकांसाठी स्फूर्तीदायी ठरला. सरदार भगतसिंह आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही त्यापासून स्फूर्ती घेतली. सावरकरांनी क्रांतीकार्यासाठी लागणारे सर्व साहित्य गुप्तपणे भारतात पाठवले. क्रांतीकार्यासाठी वैचारिक आणि साधनांची सतत रसद पुरवली. सावरकरांच्याच प्रेरणेने मदनलाल धिंग्रा यांनी १.७.१९०९ या दिवशी लॉर्ड कर्झन वायलीचा लंडन येथे वध केला, तर २१.१२.१९०९ या दिवशी क्रांतीवीर अनंत कान्हेरे या कोवळ्या तरुणाने नाशिकचा तत्कालीन कलेक्टर जॅक्सनचा विजयानंद चित्रपटगृहात वध केला. या सर्व घटनांमुळे सावरकरांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागला. भारतातील घटना आणि ब्रिटिशांकडून होणार्‍या अत्याचारांच्या बातम्या यांमुळे सावरकर अस्वस्थ झाले अन् श्यामजी कृष्ण वर्मा आणि मादाम कामा या सहकार्‍यांचा सल्ला न ऐकता धोका पत्करून ते लंडनला परतले. तेथे पोहोचताच व्हिक्टोरिया स्थानकावरच पोलिसांनी त्यांना अटक केली.

सावरकरांवर लंडन आणि भारत येथील वेगवेगळ्या ठिकाणी ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधात विद्रोहाचे रान पेटवणे, निरनिराळी कटकारस्थाने, तसेच हिंसक कारवाया करणे इत्यादी आरोप ठेवण्यात आले होते. सावरकरांना अटक केल्यावर इंग्लंडच्या न्यायालयात अधिवक्त्यांनी बाजू मांडली. डेव्हिड गार्नेट यांनी तर त्यांना कारागृहातून बळानेच सोडवण्याचा प्रयत्न करून पहिला; पण या संदर्भातले अभियोग (खटले) भारतातल्या न्यायालयात चालवले जाणार हे लक्षात घेऊन ‘सावरकरांना बोटीने मुंबईस नेले जाईल’, असे ब्रिटीश सरकारने घोषित केले. यानुसार १.७.१९१० या दिवशी सावरकरांना घेऊन ‘मोरिया’ अग्नीनौका लंडनहून भारताच्या दिशेने निघाली. गुप्तचर आणि पोलीस अधिकारी त्यांच्यासमवेत दिले. ‘भारतातील इतर जहाल क्रांतीकारक सावरकरांना सोडवण्याचा प्रयत्न करतील’, हे लक्षात घेऊन विशेष दक्षता घेण्याची सूचनाही लंडनच्या मुख्य पोलीस आयुक्तांनी दिली होती. ‘सावरकर’ या नावाचा इतका धसका ब्रिटिशांनी घेतला होता.

… असा होता उडीचा प्रत्यक्ष थरार !
पोलिसांच्या संरक्षणात या आगनावेतून सावरकरांचा प्रवास चालू झाला. त्यांच्या हातांत हातकड्या नव्हत्या. अल्पाहार आणि भोजन करते वेळी त्यांच्या दोन अंगाला पोलीस अधिकारी बसत होते. त्या आगनावेवर ९ शौचकूप होते. तिथल्या ९ गवाक्षांची मापे त्यांनी या प्रवासात घेतली. गोल खिडक्यांचा व्यास १२ इंच होता. सावरकरांच्या छातीचा घेर ३२ इंच होता. त्यांची उंची पाच फूट अडीच इंच होती. गळ्याचा घेर साडेतेरा इंच होता. आपल्या या मापाने १२ इंच व्यासाच्या पोर्टहोलमधून (शौचकुपाची अगदी लहान खिडकी) बाहेर पडणे सोपे नाही, हे त्यांच्या ध्यानात आले; पण त्याच वेळी ‘हे अशक्य नाही’, हेही त्यांनी जाणले. ८.७.१९१० ची पहाट. वेळ ६ वाजून १५ मिनिटे. सावरकर आपल्या अंथरुणात उठून बसले. पोलीस अधिकारी पार्कर हासुद्धा आपल्या अंथरुणात उठून बसला. सावरकरांनी त्याला सांगितले, ‘‘मला शौचकुपाकडे घेऊन चल.’’ त्याने ‘‘थोडा वेळ थांब’’, असे सांगितले. सावरकरही १५ मिनिटे गप्प बसले. ६.३० वाजता त्यांनी पार्करला पुन्हा तीच विनंती केली. पार्करने केबिनचे टाळे काढले. सावरकरांच्या अंगात पायजमा आणि गंजीफ्रॉक होताच; पण त्यांनी वर गाऊन चढवला. पार्कर सावरकरांना शौचकुपाकडे घेऊन आला. त्याने अमरसिंग, सखाराम सिंग आणि महंमद सिद्दिकी या पोलीस शिपायांना शौचकुपाबाहेर उभे रहाण्यास सांगितले. सावरकर आत गेल्यावर त्यांनी आतून कडी लावली. झटकन त्यांनी गवाक्षाची झडप उघडली. त्यातून आपले डोके बाहेर काढले. अंगाचा संकोच केला नि बाहेर स्वतःचे शरीर झोकून दिले. या सर्व प्रकारात त्यांच्या अंगाला बर्‍याच ठिकाणी खरचटले. त्याची तमा न बाळगता त्यांनी बाहेरच्या समुद्रात उडी मारली.

शौचकुपाच्या दाराला काच होती. त्या काचेवर त्यांनी आपला अंगातील गाऊन लटकवला. त्यामुळे बाहेरून आत काय चालले आहे, ते कळायला काहीच मार्ग नव्हता. बराच वेळ झाला, तरी बंदीवान बाहेर आला नाही. त्यामुळे बाहेरच्या अमरसिंग सखारामसिंग या शिपायाने दार ठोठावले; पण प्रतिसाद मिळाला नाही. त्याने दाराची काच फोडली. त्याला समोर जे दृश्य दिसले, ते पाहून तो हादरला; कारण त्याने बंदीवानाला खिडकीतून बाहेर समुद्रात झोकून दिलेले पाहिले. त्याच गोलाकार गवाक्षातून समुद्रझेप घेऊन बंदीवानाला पकडण्याचे धाडस त्याला झाले नाही. दोघेही शिपाई ‘‘बंदीवान पळाला’’, असे ओरडू लागले ! पोर्ट होलची झडप उघडून अत्यंत धाडसाने, कष्टाने अन् कौशल्याने त्यांनी समुद्रात उडी मारली. त्यानंतर पोहून ते फ्रान्सच्या भूमीवर पोहोचले. ब्रिटीश कैदी असलेले सावरकर हे फ्रान्सच्या भूमीवर पोचल्यास कायद्याप्रमाणे ब्रिटीश सरकार त्यांना पुन्हा पकडू शकले नसते. ‘मादाम कामा आणि अय्यर हे सावरकरांचे सहकारी सावरकरांना घेण्यासाठी बंदरावर येतील’, असे ठरले होते; मात्र त्यांना तेथे येण्यास थोडा विलंब झाला. तोपर्यंत फ्रान्सच्या पोलिसांसमोर सावरकरांनी इंग्रजीमध्ये त्यांची बाजू सांगण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना इंग्रजी कळत नव्हते. तेवढ्यातच ब्रिटीश सैनिक तेथे पोहोचले. त्यांनी सावरकरांना बलपूर्वक बोटीवर नेले.

– श्री. राजेंद्र वराडकर, कार्यवाह, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई. (दैनिक ‘सनातन प्रभात’, ८.७.२०१७)

त्रिखंडात गाजलेल्या सावरकरांच्या ऐतिहासिक उडीचे आंतरराष्ट्रीय परिणाम !
मार्सेलिस बंदरात उडी घेऊन फ्रान्सच्या भूमीत प्रवेश केल्यानंतर खरे तर ब्रिटीश सरकारला सावरकरांना कह्यात घेण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नव्हता; परंतु फ्रान्सच्या पोलिसांनी लाच घेतली. फ्रान्स आणि अमेरिकेच्या वृत्तपत्रांनी याविरुद्ध जोरदार आवाज उठवला अन् भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा डंका जगभर पोचला ! सावरकरांचा हा पराक्रम त्रिखंडात गाजला ! परदेशात प्रथमच भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची आणि भारतीय तरुणांच्या क्रांतीकारी धाडसाची चर्चा चालू झाली ! युरोपीय वृत्तपत्राने सावरकरांचे जीवनचरित्र छापले. मॅझनी-गॅरिबाल्डी या क्रांतीकारकांशी तुलना करून सावरकरांच्या शौर्याचा गौरव करण्यात आला ! एका धाडसी कृतीतून भारतीय स्वातंत्र्याचा प्रचार जगभरात करण्याच्या या प्रयत्नाला दुसरी तोड नव्हती ! त्यांची ही त्रिखंडात गाजलेली उडी हे जगभर हिंदुस्थानच्या पराक्रमाचे प्रतिबिंब होते, तसेच त्याचे त्यांनी प्रतिनिधित्वही केले !

ब्रिटिशांनी सावरकरांना बलपूर्वक कह्यात घेतल्याच्या घटनेची इंग्लंड-अमेरिका-फ्रान्स येथे सर्वत्र निंदा झाली. मादाम कामा यांनी फ्रेंच समाजवादी नेते जां जोरे आणि कार्ल मार्क्सचे नातू जां लोंगे यांना संपर्क करून सर्व घटनेची माहिती दिली. सार्वत्रिक निषेध झाल्याने ब्रिटन आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे हे प्रकरण नेण्याचे मान्य केले. अर्थात् लवादाने साम्राज्यवाद्यांच्या बाजूने निर्णय दिला. ‘गॅलीक अमेरिकन’ने या निर्णयाचा ‘थोतांड’ अशा शब्दांत धिक्कार केला !

पुढे सावरकरांवर मुंबईत खटला चालला. ‘जॅक्सनच्या वधासाठी वापरलेले पिस्तूल सावरकरांनी पाठवले होते’, हाही आरोप ठेवून त्यांना दोन जन्मठेप आणि काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली.

– श्री. राजेंद्र वराडकर, कार्यवाह, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई. (दैनिक ‘सनातन प्रभात’, ८.७.२०१७)

हेगच्या न्यायालयाने सावरकरांना दोषी ठरवले. मादाम कामा यांनी हे वृत्त पॅरिसमधील ‘ल ताँ’ आणि ‘डेली मेल’ या वृत्तपत्रांत सविस्तर वर्णनासह दिले. जाँ लोंगे यांनी सावरकरांच्या अटकेविरुद्ध झोड उठवली. सावरकरांच्या उडीच्या संदर्भात फ्रान्स सरकारने कचखाऊ धोरण स्वीकारल्याने फ्रान्सच्या लोकसभेत जाँ लोंगे यांनी त्यांचे पंतप्रधान ब्रियाँ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने ब्रियाँ यांना त्यागपत्र द्यावे लागले ! मार्सेलिस येथे गाजवलेल्या पराक्रमाने हिंदुस्थानाबाहेरचा हा सर्वांत मोठा बळी घेतला.

या एका उडीमुळे संपूर्ण युरोप खंडाने ‘स्वा. सावरकर स्वतंत्र आहेत आणि ब्रिटनचा त्यांच्यावर कोणताही हक्क नाही’, असे घोषित केले ! राजकीय आश्रयाचा विषय धसास लागला आणि ‘ब्रिटन हे अनीतिमान साम्राज्यवादी राष्ट्र आहे’, असा निर्णय युरोपने घोषित केला. स्वा. सावरकर यांनी फ्रान्सच्या भूमीवर पाऊल टाकलेले असतांना त्यांना ब्रिटनच्या स्वाधीन केले; म्हणून फ्रान्सच्या पंतप्रधानांना सत्ता सोडावी लागली होती. स्वा. सावरकर यांच्या या एका उडीने ब्रिटीश साम्राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. या एका उडीने ‘भारताचे स्वातंत्र्य’ हा जगासाठी आस्थेचा आणि चिंतेचा विषय बनला. या एका उडीने भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न सबंध जगात गाजला. भारताविषयी सर्वत्र सहानुभूती निर्माण झाली. स्वा. सावरकरांना फ्रान्सच्या भूमीवरून अनुचित मार्गाने ब्रिटनने अटक केले, याविषयी अनेक राष्ट्रांच्या धुरिणांनी टीकाच नव्हे, तर ब्रिटनची निंदा केली. राजकीय आश्रय देण्यामागील उदात्त नीतीतत्त्वे ब्रिटनने पायदळी तुडवली !

काही भारतियांना इंग्रजांचे राज्य वरदान वाटू लागले होते. तसे ते होण्याला काही पुढारी कारणीभूत होते. हा सारा भ्रम या साहसी उडीने क्षणार्धात दूर केला ! त्या काळी इंग्रजांचे साम्राज्य विश्वात अनेक ठिकाणी होते. अनेक देशांवर इंग्रज राज्य करत होते. हा विजय त्यांनी सागरावर मिळवलेल्या वर्चस्वाने खेचून आणला होता. त्याचा त्यांना गर्व होता. या प्रचंड समुद्राच्या ताकदीला न भिता स्वा. सावरकरांनी त्यात उडी घेण्याचे धाडस दाखवून ब्रिटिशांना लज्जित केले ! ‘ब्रिटीश साम्राज्याचा सर्वांत मोठा धोकादायक शत्रू म्हणजे सावरकर’, असे उद्गार त्या वेळी मुंबईच्या गव्हर्नरने काढले !

लेख संदर्भ आणि चित्र सहाय्य – दैनिक सनातन प्रभात.